उद्धव ठाकरे यांचा राजन साळवी यांना दोनदा फोन अन् म्हणाले, ‘राजन तुझ्या…’
एसीबीकडून गेल्या 8 तासांपासून राजन साळवींच्या घरी झाडाझडती सुरु आहे. तरीही राजन साळवी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार नसल्याचे त्यांनी म्हटले. तर यादरम्यान उद्धव ठाकरे यांचा दोनदा फोन आल्याचे साळवी यांनी सांगितले.
रत्नागिरी, १८ जानेवारी, २०२४ : बेनामी संपत्ती प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळवींनी साडेतीन कोटींची बेनामी संपत्ती जमा केल्याचा आरोप करण्यात आलाय. आज सकाळपासूनच एसीबीची राजन साळवींच्या घरी छापेमारी सुरू आहे. तर एसीबीकडून गेल्या 8 तासांपासून साळवींच्या घरी झाडाझडती सुरु आहे. तरीही राजन साळवी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार नसल्याचे त्यांनी म्हटले. तर यादरम्यान उद्धव ठाकरे यांचा दोनदा फोन आल्याचे साळवी यांनी सांगितले. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कुटुंबप्रमुख आहेत. आमच्यावर ज्या-ज्या वेळेला प्रसंग येतो त्यावेळी ते कुटुंबप्रमुख म्हणून पाठिशी उभे असतात. त्यांनी आज सकाळपासून दोनवेळा फोन करुन विचारपूस केली आहे. त्यांनी मला ठामपणे सांगितलं आहे की, राजन घाबरायचं कारण नाही. आम्ही तुझ्यापाठिशी शिवसेना आणि ठाकरे कुटुंब म्हणून खंबीरपणे उभे आहोत”, असे साळवी यांनी सांगितलं.