बहीणींनो कपटी, सावत्र भावापासून सावध राहा; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवरून एकनाथ शिंदेंचा खोचक पलटवार
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झाला. गडकरी रंगायतन सभागृहात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेवरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून एकनाथ शिंदेंवर घणाघात केला आहे. १५ लाख रूपये देणार होते, त्याचे पंधराशे रूपये कसे झाले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे. पंधराशेच्या वरची शून्य मिंधेंच्या खिशात गेली का? असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत खोचक टीका केली आहे. ‘भाई और बहेनो… विदेशात जो पैसा आहे, तो आणला तर तुमच्या खात्यात असेच १५ लाख रूपये येतील. मग त्या १५ लाख रूपयांचे १५०० रूपये कसे झालेत. वरची शून्य कुठे गेलीत… मिंधेंच्या खिशात गेली का? कारण जाऊ तिथे खाऊ हा त्यांचा धंदा आहे’, असे म्हणत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पलटवार केला आहे. लाडक्या बहिणीने कपटी सावत्र भावापासून सावध रहावं, असं वक्तव्य करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.