Saamana On BJP : ‘हलके’ पत्तेच त्यांना ‘भारी’ पडणार… ‘सामना’तून भाजपवर सडकून टीका
'घटक पक्षांचे 'पत्ते' पिसत मोदींनी त्यांचे तिसरे मंत्रिमंडळ स्थापन केले खरे, परंतु घटक पक्षांना फेकलेले 'हलके' पत्तेच त्यांना 'भारी' पडणार आहेत. तिसऱ्यांदा सरकार स्थापन करताना 'रालोआ' हा आपल्या सरकारचा आत्मा आहे, वगैरे म्हणणाऱ्या मोदींना मंत्रिमंडळ बनविताना, खातेवाटप करताना मात्र त्याचा विसर पडला'
ठाकरे गटाच्या शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे. भाजपने मोठे पत्ते ठेवले, हलके पत्ते मित्रपक्षांपुढे फेकले, असा हल्लाबोल सामनातून भाजपवर करण्यात आला. तर घटक पक्षांना फेकलेले हलके पत्तेच भाजपला भारी पडणार असल्याचा खोचक इशारा सामनातून भाजपला देण्यात आला आहे. ‘घटक पक्षांचे ‘पत्ते’ पिसत मोदींनी त्यांचे तिसरे मंत्रिमंडळ स्थापन केले खरे, परंतु घटक पक्षांना फेकलेले ‘हलके’ पत्तेच त्यांना ‘भारी’ पडणार आहेत. तिसऱ्यांदा सरकार स्थापन करताना ‘रालोआ’ हा आपल्या सरकारचा आत्मा आहे, वगैरे म्हणणाऱ्या मोदींना मंत्रिमंडळ बनविताना, खातेवाटप करताना मात्र त्याचा विसर पडला. त्यामुळे मोदी-3 सरकारमधील घटक पक्षांचे ‘आत्मे’ आताच अस्वस्थ झाले आहेत. हे अशांत ‘आत्म्यां’चे सरकार फार काळ तग धरू शकणार नाही!’, असा इशाराही संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून दिला आहे.