सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही? लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल
राज्यात अर्थखातं केवळ नावालाच उरल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे होमगार्ड आणि सेक्युरीटींना पगार मिळतील की नाही याची शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही, अशी चिंता संजय राऊत यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. सर्व पैसे हे लाडकी बहीण योजनेसाठी वापरले जात असल्याचा आरोप करत सरकरी डेटा वापरून देवेंद्र फडणवीस संपूर्ण बहिणींना पत्र पाठवत आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. बहिणींना पाठवत असलेल्या पत्रातून आम्हीच ही योजना कशी आणली हे फडणवीस पत्रातून सांगत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पुढे ते असेही म्हणाले, ‘लाडकी बहीण योजनेमुळे होमगार्ड आणि सेक्युरीटींना पगार मिळतील की नाही याची शंका आहे. योजनेकडे सर्व पैसा वळवला आहे. या योजनेचं श्रेय घेण्याची चढाओढ सुरू आहे. फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव वगळलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील मुख्यमंत्री हा शब्द वगळला आहे. माझ्याकडे पत्र आहे. भाजपनेच ही योजना कशी आणली, आम्हीच कशी आणली हे दाखवण्याचं श्रेय फडणवीस यांनी करत आहे.’ तर अर्थ खातं अस्तित्वात नाही, खडखडाट आहे. तिजोरी रिकामी आहे. तरीही मतांसाठी योजना रेटली जात आहे, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.