‘डबकी सुकल्यावर बेडूक नष्ट होतील’, ‘सामना’तून शिंदे-फडणवीस यांच्यावर हल्लाबोल
VIDEO | राज्याच्या सत्ताकारणात डबक्यातला बेडूक विरूद्ध हत्ती अशी झुंज, सामना अग्रलेखातून ठाकरे गटाचा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा
मुंबई : बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होत नाही, भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करून शिंदे गटाला डिवचले आहे. यानंतर शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देताना अनिल बोंडे यांची औकातच काढली. भाजप आणि शिवसेना यांच्यात वाक् युद्ध सुरू असताना त्यात आता ठाकरे गटानेही उडी घेतली आहे. डबक्यातला बेडूक हा पावसाळ्यापुरताच असतो. पाऊस गेला, डबकी सुकली की, बेडूकही नष्ट होतील. मग हत्तीची कानदुखी बरी होईल. बावनकुळ्यांनी हत्तीच्या आसपास फिरू नये. पिसाळलेला हत्ती नरभक्षक वाघ-सिंहापेक्षा भयंकर असतो. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात ‘हत्ती विरुद्ध बेडूक’ अशी विचित्र झुंज सुरू झाली आहे. बेडकांना हत्तीच्या मालकाचाच आशीर्वाद असल्याने हत्ती थोडा चिंतेत आहे इतकेच!, असे समानातून म्हटले आहे. दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे. फडणवीस यांच्या प्रवक्त्याने एकनाथ शिंदे यांना बेडूक म्हटले. तरी बेडकांची चाळीस पिले तोंडातून अक्षर काढायला तयार नाहीत. सगळे चिडीचूप आहेत, असे म्हणत सामनातून निशाणा साधण्यात आला आहे.