जय भवानी-जय शिवाजी, जय श्रीराम, हर हर महादेव म्हणत आम्हाला मत द्या, उद्धव ठाकरेंनी का केलं असं आवाहन?
निवडणूक आयोगाने अमित शाह यांच्यासाठी नियम बदलले आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तर जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया म्हणून आम्हाला मतदान करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला करून निवडणूक आयोगाला टोला लगावला आहे.
मुंबई, १६ नोव्हेंबर २०२३ | केंद्रीय निवडणूक आयोगाने अमित शाह यांच्यासाठी नियम बदलले आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यासंदर्भातील विचारणा करणारं पत्र उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात मध्यप्रदेशातील प्रचारसभेत एक वक्तव्य केले होते. अमित शाह यांच्या त्या वक्तव्यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. अशातच याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी आयोगाला तसं पत्र लिहिले आहे. आयोगाने त्यांच्या नियमात काही बदल केले असतील तर तसा आम्हालाही प्रचार करता येईल आणि जर बदल केले असतील तर निवडणूक आयोगाने तात्काळ खुलासा करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी आयोगाकडे केली आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया म्हणून आम्हाला मतदान करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला करून निवडणूक आयोगाला टोला लगावला आहे.