‘लाडक्या बहिणीं’च्या छोट्या मुली…’, बदलापूर घटनेवरून उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला
बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमूरडींवर झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. या प्रकरणावरून एकच वादळ निर्माण झाले आहे. राज्यभरातून या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी तर या मुद्द्यावरून सरकारला चांगलंच धारेवर धारलं आहे.
‘लाडक्या बहिणींना 1500 रुपये नको, त्यांना संरक्षण द्या’, असा हल्ला विरोधकांकडून केला जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावरून सरकारला चांगलंच फटकारलं आहे. राज्यात लाडक्या बहिणींच्या मुलीही असुरक्षित आहेत, असा खोचक टोलाच उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. मातोश्री येथे माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली आहे. या घटना संपूर्ण देशात वारंवार घडत आहे. आपल्याकडे एक घाणेरडी पद्धत झाली आहे. ठरावीक राज्यातील ठरावीक घटनांचं राजकारण केलं जात आहे. एका बाजूला लाडकी बहीण योजना आणतो. पण या बहिणींच्या छोट्या छोट्या मुली असुरक्षित आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. अशा घटना घडता कामा नये. नराधमाला शिक्षा झाली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच न्याय देण्यास दिरंगाई करणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.