“देवेंद्र फडणवीस संभाजी भिडे यांना ‘गुरुजी’ म्हणत असतील तर…”, उद्धव ठाकरे यांचा टोला; म्हणाले….
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडे यांचा उल्लेख संभाजी भिडे गुरुजी असा केला. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
मुंबई, 03 ऑगस्ट 2023 | शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या आक्षेपार्ह विधानाचे कालही विधानसभेत पडसाद उमटले. संभाजी भिडे यांना अटक करा या मागणीवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडे यांचा उल्लेख संभाजी भिडे गुरुजी असा केला. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, “संभाजी भिडेंबाबत मी काय बोलणार? शासनकर्ते जे आहेत त्यांनी यावर बोललं पाहिजे. मी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया कशी काय देणार? राज्यकर्त्यांनी सांगितलं पाहिजे हे योग्य आहे आणि अयोग्य आहे. तसंच फडणवीस जर भिडे यांना गुरुजी म्हणत असतील तर त्यांचं सगळंच बरोबर असं म्हटलं पाहिजे. आपण भविष्याकडे न पाहता इतिहास उगाळत आहोत. त्यातून काही मिळणार नाही. इतिहासात गुंतवून ठेवायचं आणि देशाला आणि राज्याला मारायचं ही पद्धतच घातक आहे. त्यामुळे भिडे गुरुजींनी चांगले धडे आपल्या विद्यार्थ्यांना द्यावेत हीच अपेक्षा आहे.”