MSRTC | ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ‘लालपरी’ पुन्हा होणार ठप्प? ST कर्मचारी पुन्हा संपावर?
VIDEO | राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर करणार आंदोलन? आजपासून एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू, राज्य सरकारला काय दिलं अल्टिमेटम?
मुंबई, ११ सप्टेंबर २०२३ | राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे हे उपोषण आजपासून सुरू करण्यात आलं आहे. तर राज्य सरकारला दोन दिवसांचं अल्टिमेटम देण्यात आले असल्याचे एसटी कर्मचारी संघटनांकडून सांगितले जात आहे. राज्य परिवहन महामंडळाचे शासकीय सेवेत विलीनीकरण करावे, तसेच प्रलंबित असलेला महागाई भत्ता आणि 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे, अशी मागणी या एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. तर ऐन सणासुदीत आम्ही प्रवाशांची कोणतीही अडवणूक करत नसून आमच्या मागण्यांसंदर्भात गेल्या महिन्यात सरकारला पत्र दिले होते मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे एसटी कर्मचारी संघटनेकडून सांगितले जात आहे.
तर गेल्या संपात वकील गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला होता. यावरही एसटी संघटनेने भाष्य केले आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मागे झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान आपलं हित साधलं तसेच आझाद मैदानात गुलाल उधळून सातवा वेतन आयोग लागू झाला, असे म्हटले होते. परंतु त्याप्रमाणे पैसे मिळाले नाही, खोटे बोलणाऱ्यांना एसटी कर्मचारी कधीही साथ देत नसल्याचे यावेळी त्यांनी म्हटले.