Narayan Rane Arrest | केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक, कार्यकर्त्यांचा पोलीस स्टेशनाबाहेर ठिय्या
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणें यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा केली होती. या वक्तव्यामुळे त्यांना अटक करण्यात आली असून त्यांमुळे त्यांचे कार्यकर्त्ये आक्रमक झाले आहेत.
नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहेत. नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. रत्नागिरी कोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर आता अखेर नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली खेचली असती अशी भाषा केल्याने नारायण राणेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथकं चिपळूणकडे रवाना झाली. त्यातच युवासेना आणि शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत मुंबईतील नारायण राणे यांच्या घराकडे कूच केली. वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात युवासेनेचे कार्यकर्ते राणेंच्या बंगल्यावर निर्देशने केली.