डोंबिवलीत पुन्हा फेरीवाल्यांची अरेरावी, रुग्णवाहिका चालकास बेदम मारहाण; बघा काय नेमकं काय घडलं?
VIDEO | डोंबिवलीत पुन्हा एकदा फेरीवाल्यांचा मारहाणीचा व्हिडिओ आला समोर, रुग्णवाहिका चालकास फेरीवाल्यांकडून बेदम मारहाण... पण काय आहे कारण?
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांनी अधिकाऱ्यांची बोटं छाटल्याचे प्रकरण ताजे असतानाच डोंबिवली पूर्व येथे फेरीवाल्यांनी रुग्णवाहिका चालकाला बेदम मारहाण केली असल्याची घटना समोर आली असून या मारहाणीत रुग्णवाहिका चालक जखमी झाला आहे. गणेश माळी असे जखमी झालेल्या चालकाचे नाव असून डोंबिवली पूर्वेतील पूजा मधुबन चित्रपट गृहासमोर असणाऱ्या एका खाजगी रुग्णालयात रुग्णवाहिका चालक म्हणून काम करतो. याच रुग्णालयाच्या रस्त्यावर आजूबाजूला अनेक फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. फूटपाथला लागूनच हे फेरीवाले बसत असल्याने काही कडापे त्यांनी या ठिकाणी ठेवले आहेत. रुग्णवाहिका घेऊन जाण्यासाठी चालक रुग्णवाहिका फिरवून घेत असताना फुटपाथवर ठेवलेल्या एका कडाप्याला रुग्णवाहिकेची धक्का लागला. यामुळे येथे बसणारे फेरीवाले रुग्णवाहिका चालकाला जाब विचारण्यासाठी आले आणि त्याच्याशी बाचाबाची करू लागले. बाचाबाची करताना संतप्त झालेले या फेरीवाल्यांनी रुग्ण वाहिका चालकाला बेदम मारहाण केली. यामुळे हा रुग्णवाहिका चालक जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. या संदर्भात त्याने रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास रामनगर पोलीस करत आहेत.