बेशिस्त, मुजोर रिक्षा चालकाचा माज व्हायरल; हात जोडून विनवण्या तरीही शिवीगाळ अन् बेदम मारहाण, बघा व्हिडीओ
शुल्लक कारणावरून एका कार चालकाला मारहाण करतानाचा मुजोर रिक्षा चालकाचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. नाशिकमधल्या अशा रिक्षा चालकांवर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली. संबंधित रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये मुजोर रिक्षा चालकाचा माज पाहायला मिळाला आहे. तरुणाची गाडी अडवून या रिक्षा चालकाने शिवीगाळ आणि मारहाण केली आहे. गाडीतली महिला हात जोडून त्या रिक्षा चालकाकडे मारू नका अशी विनंती करते. हात जोडते आहे पण तरीही रिक्षा चालक मागे हटत नाहीये. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे बेशिस्त रिक्षा चालकाचा माज दिसून येतोय. अशा रिक्षा चालकावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे. कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून रिक्षा चालकाने फोर व्हीलरच्या समोर रिक्षा अडवी घातली आणि गाडी चालवणाऱ्या तरुणाला शिव्या देत मारहाण सुरू केली. रिक्षा चालक गाडीतल्या तरुणाला खाली खेचत होता. याच वेळी गाडीतला तरुण हात जोडून माफी मागत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. गाडीतली महिला देखील विषय सोडून द्या असं म्हणत हात जोडत आहे. तरी देखील रिक्षा चालक काही थांबताना दिसत नाहीये. शालिमार चौकातल्या रिक्षा चालकाची जुंडशाही नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केली आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर झोपेतून जागे झालेल्या पोलिसांनी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे. नाशिक शहरात रिक्षा चालकांकडून अनेक वेळा कार चालकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. भर रस्त्यात रिक्षा उभ्या करणे, वाहन चालकांशी हुज्जत घालत भांडण करणे असे प्रकार अनेक वेळा घडल्याचे दिसून आले आहे. बेशिस्त आणि अनधिकृतपणे कुठलाही परवाना नसताना प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.