Kolhapur : आशीर्वाद घ्यायला आलो, यामध्ये राजकारण नाही; शाहू छत्रपतींच्या भेटीनंतर संजय राऊतांचं स्पष्टीकरण
संभाजीराजेंच्या अपक्ष निवडणूक लढवण्याच्या निर्णयामागे भाजप असू शकतो, अशी शाहू महाराजांनी काल शक्यता वर्तवली होती.
कोल्हापूर : शिवसेनेने संभाजीराजेंची राज्यसभेची उमेदवारी नाकारली यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं दिसतंय. यातच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी शाहू छत्रपती (Shahu Chhatrapati) महाराजांची भेट घेतली. यावेळी राऊत म्हणाले की, ‘शाहू छत्रपतींची आत्मियतेने भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शाहू छत्रपतींशी फोनवरून चर्चा केली, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी शाहू छत्रपती (Shahu Chhatrapati) महाराजांची भेटी न्यू पॅलेस इथे घेतली. संभाजीराजेंच्या अपक्ष निवडणूक लढवण्याच्या निर्णयामागे भाजपा असू शकतो, अशी शाहू महाराजांनी काल शक्यता वर्तवली होती. शाहू महाराजांच्या या भूमिकेचे शिवसेना आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून स्वागत करण्यात आले होते. त्यापार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची होती. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राजकारण झाले. आरोप-प्रत्यारोप झाले. याविषयी संभाजीराजेंच्या (Sambhajiraje Chhatrapati) समर्थकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच एकूणच महाविकास आघाडीवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला नाही, अशी भूमिका संभाजीराजे छत्रपतींनी मांडली होती.