विधानसभा अध्यक्ष संतापतात तेव्हा… ‘मक्तेदारी चालणार नाही’, कुणाला दिला इशारा?
कुलाबा येथील विकासकामांची अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाहणी केली. यावेळी ते भलतेच संतापले. तुम्ही मदत केली ते बांद्रा येथे जाऊन बसलेत अशा शब्दात त्यांनी कानउघडणी केलीय. तर, 16 आमदारांच्या अपात्र प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलंय.
कुलाबा : 1 ऑक्टोबर 2023 | 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. याबाबत बोलताना ही सर्व कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यावर बोलणं अधिक उचित नाही. कुठल्याही प्रकारची घाई आणि दिरंगाई केली जाणार नाही. कशी सुनावणी होणार आहे याची माहिती सर्व पक्षकारांना दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा मान राखला जाईल. अध्यक्ष यांची बाजू न्यायालयात योग्य पद्धतीने मांडली जाईल, संविधांच्या तरतुदींची माहिती नाही त्याचा विचार करणार नाही, असे त्यांनी सांगितले. कुलाबा कोळीवाडामध्ये राहुल नार्वेकर यांनी विकासकामांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काही स्थानिकांनी त्यांना विशिष्ट स्थानिक कार्यकर्ते यांना विकासकामांबाबत विश्वासात घ्यायला सांगितले. त्यावर राहुल नार्वेकर संतापले. इकडे कोणाची मक्तेदारी चालणार नाही. एक दोन लोकांना घेऊन चालणारा मी नाही. सर्वांचे मत घेऊन चालणारा माणूस आहे. लोकांमध्ये उभा राहणारा माणूस आहे. निवडणुकीत ज्यांना मदत केलीत ते बांद्रात जाऊन बसलेत अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.