निकाल देण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी एवढा वेळ का लावला ? काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. या निकालावर वंचित बहुजन आघाडीने आपली प्रतिक्रीया दिली आहे. राहुल नार्वेकर यांनी निकाल देण्यासाठी एवढा वेळ का लावला असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
मुंबई | 10 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला आहे. त्या निकालाने आमचे मित्र उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. अपेक्षा होती त्याप्रमाणे निकाल लागला नाही. आमची सहानुभूती त्यांच्या सोबत आहे. त्याची परिस्थिती आम्ही समजू शकतो असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. परंतू कायदेशीरित्या पाहता. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि सुप्रिम कोर्ट यांनी स्पष्ट केल्यानंतर तो निकाल भले बरोबर असो की चूक असो. पार्टी जी आहे ती एकनाथ शिंदे यांची आहे असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्याने हा अर्ज निकालात काढणे ही केवळ औपचारिकताच उरली होती. परंतू राहुल नार्वेकर यांनी एवढा वेळ का लावला ? हाच निकाल तो आधीही देऊ शकत होते. जेव्हा पार्टी आणि सिम्बॉल दोन्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे असे जेव्हा सुप्रिम कोर्ट म्हणते तेव्हा त्यावेळी राहुल नार्वेकर यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अशा प्रकरणात स्पीकरने याआधीच निर्णय घ्यायला हवा होता असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.