Shivsena : ‘त्या’ एका घोषवाक्याने शिवतीर्थावर जनसागर लोटणार का? शिवसेनेची जनतेला साद काय?
गेल्या काही दिवसांपासून सर्वकाही प्रतिकूल घडत असतानाच उच्च न्यायालयाचा निकाल केवळ मेळाव्यासाठीच महत्वाचा नाहीतर पक्षाचा आत्मविश्वास आणि इतर बाबींसाठीही तेवढाच महत्वाचा आहे.
मुंबई : उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर शिवसेना (Shivsena Party) आता दसरा मेळाव्याच्या तयारीला लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून मेळाव्यासाठी शिवतिर्थावर परवानगी मिळते की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात होती. अखेर उच्च न्यायालयाच्या (High Court) परवानगीनंतर आता थेट कामाला सुरवात केली जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यापूर्वीच गटप्रमुखांना गर्दी करण्यासंदर्भात अवाहन केले होते. तर आता सोशल मिडियावर शिवसेनेचे बॅनर झळकू लागले आहेत. ‘तुफान उसळणार, आवाज घुमणार’ अशा आशयाचे हे बॅनर असून या घोषवाक्यावरुनच जनतेने मेळाव्याला उपस्थित राहण्याचे अवाहान केले गेले आहे. शिवाय आपल्या तेजस्वी वारस्याला गालबोट लागू नये असेही शिवसेना पक्षप्रमुख यांनी सांगितले आहे.
उच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा आनंद गगणात मावेना झाला होता. गेल्या काही दिवसांपासून सर्वकाही प्रतिकूल घडत असतानाच उच्च न्यायालयाचा निकाल केवळ मेळाव्यासाठीच महत्वाचा नाहीतर पक्षाचा आत्मविश्वास आणि इतर बाबींसाठीही तेवढाच महत्वाचा आहे.
निकालानंतर लागलीच शिवसेनेच्या गोठातून वेगवेगळे बॅनर सोशल मिडियावर झळकू लागले आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून वातावरण निर्मितीवर भर दिला जाणार आहे. त्याच अनुषंगाने ‘तुफान उसळणार, आवाज घुमणार’या घोषवाक्याने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे.