Ladki Bahin Yojana : लाभार्थी होण्यासाठी ‘लाडक्या बहिणीं’चे मोठे हाल, रात्रभर बँकेच्या बाहेर उभ्या अन्…
राज्यसरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्यातील सर्व महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी होण्यासाठी अंतिम तारीख आहे. त्यामुळे महिलांची धावाधाव सुरू आहे.
सरकारने मोठा गाजावाजा करत महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली. मात्र आदिवासी भागात बँकांची संख्या कमी असल्याने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बँकामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून महिलांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. मात्र ग्रामीण भागातून येऊन काम होत नसल्याने चकरा माराव्या लागत आहे. काम होत नसल्याने आणि दररोज येण्या-जाण्यासाठी होणारा खर्च परवडणारा नसल्याने घरून भाकरी बांधून आदिवासी महिला बँकांच्या बाहेर मुकामी थांबत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य असल्याने ई-केवायसी करण्यासाठी महिलांनी रात्रीपासून बँकेसमोर भलीमोठी लाईन लावल्याचे पाहायला मिळाले. तर बँकेत नंबर लागत नसल्याने रात्री बँकेच्या बाहेर थांबून नंबर लावण्याची वेळ या लाडक्या बहिणीवर आल्याचे चित्र नंदुरबारमध्ये पाहायला मिळत आहे.