पंढरपुरातील बॅनरवरून नवा वाद; पांडरंगाचा अपमान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, तर भाजप नेता म्हणतो…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपूरमध्ये लावण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पांडुरंगाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, पंढरपूर मध्ये लावण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पांडुरंगांचा अपमान राज्य सरकारकडून केला गेला.
सांगली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपूरमध्ये लावण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पांडुरंगाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, “पंढरपूर मध्ये लावण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पांडुरंगांचा अपमान राज्य सरकारकडून केला गेला. तर हे सरकार जाहिरातीचे सरकार आहे. जाहिरात करुन पंढरपूर मध्ये पांडुरंगाचे अपमान करत महाराष्ट्र आणि दैवतांचा आपमान केला आहे.या सरकारला आमचा खुला इशारा, पांडुरंगाचा अपमान काँग्रेस खपवून घेणार नाही.” यावर भाजपच्या तुषार भोसले यांनी नाना पटोले यांच्यावर पलटवार केला आहे. “प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याची वेळ आली, तरी नाना पटोले यांना परिपक्वता आली नाही.निष्ठेने जो वारकरी पंढरपूरची वारी करतो, त्याच्या सावलीतून विठ्ठलाची प्रतिमा तयार झालीय, असं त्या फोटोतून दिसत आहे. मंदिर आणि चर्चचे उंबरठे झिजवणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना वारकरी आणि विठ्ठलाचे नाते तरी काय कळणार?,” असा खोचक टोला तुषार भोसले यांनी लगावाला.