Bhima Kesari Kusti : शाब्बास रे पठ्ठ्या…! महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, पटकावली भीमा केसरीची गदा
भाजपा खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर भीमा केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने पंजाब केसरी प्रदीप सिंगला धूळ चारत दुसऱ्यांदा भीमा केसरीची गदा पटकावली
सोलापूर, ९ जानेवारी २०२४ : कै. भीमराव महाडिक यांच्या स्मरणार्थ आणि भाजपा खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर भीमा केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने पंजाब केसरी प्रदीप सिंगला धूळ चारत दुसऱ्यांदा भीमा केसरीची गदा पटकावली आहे. यामुळे आता त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान या स्पर्धेत शेकडो मल्लांनी सहभाग घेतला होता. भीमा केसरीची प्रमुख लढत खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते लावण्यात आली होती. या स्पर्धेसाठी तब्बल 15 लाख रुपयांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली होती. यावेळी या स्पर्धा पाहण्यासाठी अनेक लोकांनी हजेरी लावली. पंजाब केसरी विजेता प्रदीपसिंग जिरगपूर आणि महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्यात कुस्तीचा सामना चांगलाच रंगला होता. मात्र अखेर या सामन्यात सिकंदर शेखने प्रदीपसिंग जिरगपूरला पराभवाची धूळ चारत गदा पटकावली. सामना जिंकल्यानंतर राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा सिकंदर शेखला सुपूर्द करण्यात आली.