जलसिंचन नाही, अजित पवारांकडे आता ‘हे’ मंत्रिपद?
अजित पवारांनी सहकार विभाग आणि साखर विभागाच्या प्रशासनाकडून आढावा घेतल्यामुळे अजित पवारांकडे सहकार क्षेत्राची जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत आहेत.
मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे सहकार मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्रिपदासोबत अजित पवारांकडे (Ajit Pawar Ministry) सहकार क्षेत्राची (Co-Operation Ministry) जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत मिळत आहेत.
राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप बाकी आहे. मात्र त्याआधीच अजित दादा अॅक्शन मूडमध्ये दिसत आहेत. यंदाचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सहकार विभाग आणि साखर विभागाच्या प्रशासनाकडून आढावा घेतला.
साखर कारखाने 25 तारखेपासून सुरु झाले आहेत, मात्र काही कारखान्यांच्या अडचणी आहेत, हार्वेस्टिंग आणि इतक काही समस्या असल्यामुळे त्यासाठी निधीची गरज आहे. या समस्यांसंदर्भात तोडगा काढण्याची गरज आहे, असं मत अजित पवारांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना व्यक्त केलं.
सहकार विभाग आणि साखर आयुक्त विभागाला एकत्र येऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. ऊसतोड झाली पाहिजे, कारखाने बंद पडू नयेत, कारण रोजगाराचा प्रश्न आहे. त्यामुळे सकारात्मक भूमिकेचा प्रयत्न असल्याचं अजित पवार म्हणाले.
विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले बिनविरोध
सभागृह चालवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांना एकमेकांची गरज लागते. त्यासाठी सामंजस्याची आवश्यकता असते. महाराष्ट्राची ती परंपरा आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षपद यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये असलेला वाद आता शमला आहे. कारण विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे गेलं आहे, तर उपमुख्यमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडे राहणार आहे.
उपमुख्यमंत्रिपदासाठी सुरुवातीला जयंत पाटील यांचं नाव आघाडीवर होतं. अजित पवारांनी बंड पुकारल्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता कमी होती. परंतु दरम्यानच्या काळात अजित पवारांचे पुन्हा रुसवे-फुगवे झाल्यामुळे त्यांच्याकडेच उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
गंमत म्हणजे अजित पवार यांनी बंडखोरी करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे अजित पवार आधी एका पक्षासोबत आणि नंतर दुसऱ्या पक्षासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना दिसतील, तेही अवघ्या काही दिवसांच्या अंतराने. मात्र अद्याप अधिकृत घोषणा बाकी असल्याने राष्ट्रवादीकडून नेमकं कोण उपमुख्यमंत्री (Ajit Pawar Ministry) होणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.