अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील 25 मुद्दे
अजित पवारांनी पत्रकार परिषदेत माहिती राजीनामा का दिली यासह इतरही सर्व माहिती दिली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही पत्रकार परिषद (Ajit Pawar press conference) पार पडली.
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar press conference ) यांनी शुक्रवारी (27 सप्टेंबर) आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर ते गायब झाले. मात्र त्यानंतर शनिवारी (28 सप्टेंबर) ते शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्याआधी खुद्द शरद पवार हे पुण्यावरुन मुंबईतील घरी सिल्व्हर ओकला पोहोचले. शरद पवारांच्या घरी पवार कुटुंबीयांची बैठक झाली. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषदेत माहिती राजीनामा का दिली यासह इतरही सर्व माहिती दिली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही पत्रकार परिषद (Ajit Pawar press conference) पार पडली.
अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतील 25 मुद्दे
1. “अगोदर 70 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप, त्यातून मला वेदना झाल्या, चौकशीही संपत नाही, ती किती दिवस चालवायची ते आपल्या हातात नाही, पुन्हा 25 हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप, लोकांना वाटेल अजित पवारला हजार कोटींशिवाय चालतच नाही की काय?” : अजित पवार
2. “पवार साहेबांचा फोन आला आणि ते भेटायचं म्हणाले, ते स्वतःच मुंबईत आले, त्यांना सर्व भूमिका सांगितली, त्यांनीही मला आवश्यक ते सांगितलं, त्यांनीच पत्रकारांसोबत सर्व स्पष्ट करण्याच्या सूचना केल्या” : अजित पवार
3. “आमचे थोरले काका शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. शरद पवार हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत. ते जे म्हणतात ते अंतिम असतं. मी राजकारणात आलो, सुप्रिया सुळेंच्या राजकारणातील प्रवेशाच्या वेळी, पार्थच्या वेळी आणि आता प्रदेशाध्यक्षांनी रोहितला संधी दिली तर अशीच चर्चा केली जाते. शरद पवारांनी मला भेटण्याबाबत विचारणा केली आणि ते आज मुंबईत आले. त्याच्याकडे माझी भूमिका सांगितली. त्यांनी मला जे सांगायचं होतं ते सांगितलं. त्यांनीच मला पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे भूमिका मांडण्यास सांगितले.” – अजित पवार
4. “माझ्या सद्सदविवेक बुद्धीला स्मरुन राजीनामा दिला. त्यामुळे आमचे कार्यकर्ते, हितचिंतक असतील , या सर्वांना वेदना झाल्या. त्यांना कळलं नाही, की मी न विचारता राजीनामा का दिला. असाच प्रसंग मागे उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात झाला होता. मी सांगू इच्छितो की असा प्रसंग येतो तेव्हा, जयंतराव, भुजबळ, तटकरे किंवा दिग्गज नेत्यांना सांगितलं असतं. ती माझी चूक होती की नव्हती, त्याच्या खोलात मी जात नाही. त्यांना मी न सांगता हा निर्णय घेतला, त्याबद्दल मी माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो.”
5. “खरं म्हणजे आम्ही सर्वजण महाराष्ट्र राज्य बँकेत संचालक म्हणून कार्यरत होतो. आमचं बोर्ड बिनविरोध निवडून आलं होतं. मी पुण्यातून प्रतिनिधीत्व करण्यापूर्वी वळसे पाटील होते. आज सर्वच पक्षाचे प्रतिनिधी, सहकारी त्या बोर्डात होते. त्या बोर्डावर कारवाई करण्यात आली. तो त्यावेळचा निर्णय होता. त्याची चौकशी सुरु होती. सभागृहात विविध उत्तरं देत होते. संबंधित खात्याच्या सहकार मंत्र्यांनी सांगितलं 1 हजार 88 कोटी रुपयांची अनियमितता झाली अशी माहिती सभागृहात दिली. त्याचे पेपर माझ्याकडे आहेत.”
6. “सहकारी कारखाने अडचणीत आले तर आपल्याला मदत करावी लागले, या सरकारने चार सहकारी कारखान्यांना (धनंजय महाडिक, पंकजा मुंडे, कल्याण काळे यांचे कारखाने) मदत केली, तो सरकारचा अधिकार आहे.” : अजित पवार
7. “घोटाळ्याबाबत सतत आमच्याचबाबत बातम्या येतात, साहेबांमुळे मी उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो, पण आपल्यामुळे त्या माणसाचं नाव येतं हे पाहून व्यथित झालो, राजीनामा देऊन यातून बाहेर पडलं पाहिजे ही भावना मनात होती.” : अजित पवार
8 “माझा सांगण्याचा अर्थ एकच आहे, की मी कधीतरी बैठकीला जायचो, आम्ही वाटप केलेलं सर्व कर्ज फिटलेलं आहे, कोणतंही कर्ज थकलेलं नाही.” : अजित पवार
9. “वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देतोय हे विधानसभाध्यक्षांना सांगितलं, मी सिल्वर ओकला का गेलो नाही हे अनेकांनी विचारलं, पण बारामतीत पूरस्थिती होती, दिवसभर मी तिथे होतो, रात्री उशिरापर्यंत लोकांना मदत केली.” : अजित पवार
10. “शरद पवारांचा या प्रकरणात कोणत्याही काडीचा संबंध नाही. ते कोणत्याही सहकारी बँकेवर संचालक नाहीत. 25 हजार कोटींचा घोटाळा झाला म्हणतात, बँक नफ्यात आहे, घोटाळा झाल्यावर बँकेला नफा कधी होतो का? आमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत, 100 कोटीपेक्षा जास्त रक्कम असल्याने साहजिकच ईडीकडे प्रकरण गेलं, पण पवार साहेबांचा काडीचाही संबंध नाही” : अजित पवार
11. “संचालक मंडळात अजित पवार हे एकमेव नाव नसतं तर केसही दाखल झाली नसती, पण माझ्यामुळे पवार साहेबांचं नाव आलं. हे बोलल्यानंतर अजित पवार भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.” : अजित पवार
12. “पवार साहेबांनी सांगितलं, मी तुझं सगळं ऐकलं, ‘उद्या मी जो निर्णय घेईल ते तुला करावं लागेल’, मी खाली मान घातली आणि तिथून निघून आलो.” : अजित पवार
13. “पंजाब महाराष्ट्र बँकेचे संचालक कोण आहेत हेही शोधावे.” – अजित पवार
14. “पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचा प्रमुख म्हणून काही अनियमितता आढळल्यावर चौकशी लावली हा त्यांचा अधिकार आहे. मुद्दा इतकाच आहे की ही चौकशी लवकर संपवून जे आहे ते सांगितलं पाहिजे.” – अजित पवार
15 “शरद पवारांनी मला भेटीच्या शेवटी पुढील काळात ते जो निर्णय घेतील तो ऐकावं लागेल, असं सांगितलं. मी खाली मान करुन तेथून आलो आहे. त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो माझ्यासाठी अंतिम राहिल. शरद पवारांना या वयात ईडीच्या कार्यालयात जावं लागत आहे. संचालक मंडळात अजित पवारांचं नाव नसतं तर हे प्रकरण उभं राहिलं नसतं. माझ्या नावामुळे शरद पवारांना त्रास झाला.” – अजित पवार
16. “संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी स्वतः सभागृहात काही कोटींची अनियमितता असल्याचं (नियमबाह्य कर्ज दिल्याचं) सांगितलं आहे. तरीही राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप केला.”
17. “वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी वेगवेगळ्या बातम्या दिल्या. त्याची मी तयारी ठेवली होती. राजीनामा दिल्यानंतर कोठेतरी शांतपणे बसावं म्हणूनच काल मी नातेवाईकांकडे थांबलो. पक्षातून अनेकजण गेले. त्यात आम्ही कमी पडलो असं मी समजतो. मी कधीही व्यक्तिगत टीका केली नाही.”
18. “हरिभाऊ बागडेंनी मला राजीनामा का दिला हे विचारलं, मात्र मी सांगितलं नाही. त्यांना मी वैयक्तिक कारण असल्याचं सांगितलं. माध्यमांनी मुंबईत असताना पवारांना का भेटले अशी बातमी रंगवली. मात्र, मी बारामतीचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे तेथे मदत कार्य पाहण्यासाठी मी पुण्याला गेलो. मुंबईत शरद पवारांच्या सिल्व्हर ओकला जाण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहतूक कोंडीची अडचण आली.” – अजित पवार
19. “मी शक्यतो सर्व गोष्टी शरद पवारांना सांगतो. मात्र, शरद पवारांना या वयात त्रास झाल्याने मी कुणालाही न सांगता राजीनाम्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी माझा फोन बंद करुन ठेवला. काल मी मुंबईतच नातेवाईकांकडे होतो. हे 2010 चं प्रकरण आहे. ते आज निवडणुकीच्या काळातच का आणलं गेलं.” अजित पवार
20. “100 कोटीपेक्षा अधिकचं हे प्रकरण असल्याने ते ईडीकडे गेले. ते कोणत्याही साखर कारखान्यावर पदाधिकारी नाही. असं असताना परवा शरद पवारांसह 70 जणांच्या नावे गुन्हे दाखल झाल्याच्या बातम्या केल्या गेल्या. माझ्यामुळे शरद पवारांची बदनामी होते आहे. ज्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहचलो त्यांनाच माझ्यामुळे त्रास होतो आहे हे पाहून मी अस्वस्थ झालो. त्यामुळे मी याच्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.” – अजित पवार
21. “देशातील कुणालाही जनहित याचिका करण्याचा अधिकार आहे. अशाच एका जनहित याचिकेत 25 हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला. त्या बँकेत साडेबारा हजार कोटीच्या ठेवी आहेत. अशा बँकेत 25 हजार कोटीचा भ्रष्टाचार कसा होऊ शकतो. 30 वर्ष मी राजकारणात आहे. बारामतीचं प्रतिनिधित्व करतो आहे. जे काम आम्ही केलं तेच काम बँक अस्तित्वात आल्यापासून अनेक दिग्गजांनी केलं आहे. या बँकेत चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक लोक आहेत.” – अजित पवार
22 . “तीन दिवसांपूर्वी हरिभाऊ बागडेंना फोन करुन तुम्ही मुंबईत कधी आहात हे विचारलं होतं. मागील 2-3 दिवसांपासून हा विचार माझ्या मनात होता. माझ्यामुळे पक्षातील इतर सहकाऱ्यांना अडचणीत आणणं योग्य आहे का असं वाटत होतं. आमचं मंडळ सर्वपक्षीय होतं आणि बिनविरोधपणे निवडून आलं होतं. अशा मंडळावर कारवाई करण्यात आली. त्याची चौकशी सुरू होती. संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी अनियमितता झाल्याचा आरोप सभागृहात केला होता.” – अजित पवार
23. “माझ्या सदसदविवेकाला जागून राजीनामा दिला. या निर्णयाने पक्षातील अनेकांना दुःख झालं. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा झाला तेव्हाही असंच झालं होतं. मी जर कुणालाही सांगितलं असतं तर त्यांनी मला निर्णय घेऊ दिला नसतो. त्यांना दुखावलं म्हणून मी त्यांची माफी मागतो.” – अजित पवार
24. “सहकारी कारखाने अडचणीत आले तर आपल्याला मदत करावी लागले, या सरकारने चार सहकारी कारखान्यांना (धनंजय महाडिक, पंकजा मुंडे, कल्याण काळे यांचे कारखाने) मदत केली, तो सरकारचा अधिकार आहे.” : अजित पवार
25. “राजकीय जीवनात सहकारी संस्था आजही आम्ही सुरळीतपणे चालवण्याचं काम करतो, अनेक दिग्गज नेत्यांनी या संस्थांमध्ये काम केलं, या काळातही कारखाने काय किंमतीत विकले ते पाहिलं तर परिस्थिती लक्षात येईल.” : अजित पवार