शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेस अनुकूल : सूत्र
राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटण्याची चिन्ह आहेत. काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल (Congress is positive to support Shivsena) असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
जयपूर : राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटण्याची चिन्ह आहेत. काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल (Congress is positive to support Shivsena) असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काँग्रेसमधील तरुण आमदारांनी आग्रह केल्यानंतर काँग्रेस आता शिवसेनेला पाठिंबा देण्यास सकारात्मक झाल्याचं बोलला जात आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष अंतिम निर्णय उद्या (10 नोव्हेंबर) घेणार आहेत, असंही सुत्रांनी सांगितलं आहे.
काँग्रेसमधील तरुण आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्यास आग्रही असल्याने काँग्रेस यावर सकारात्मक असल्याचं सांगितलं जात आहे. याला काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी देखील दुजोरा दिला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेसोबत काही वैचारिक मतभेद देखील असल्याचं नमूद केलं. तसंच यावर अंतिम निर्णय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी याच घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्व आमदारांना जयपूर येथे हलवण्यात आलं आहे. तेथे सुरु असलेल्या बैठकीत काँग्रेसच्या आमदारांच्या सह्या देखील घेण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. सोबत शिवसेनेने देखील आपल्या आमदारांच्या सह्या घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यपालांकडे सत्तास्थापनाचा दावा सादर करताना शिवसेना पाठिंबा असलेल्या आमदारांच्या सह्याचं पत्र राज्यपालांना सादर करेल.
संजय राऊत दिल्लीला जाणार?
राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रण दिल्यापासून शिवसेनेकडून सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. नुकतीच मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक झाली. यामध्ये संजय राऊत नवी दिल्लीला सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्तास्थापन करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.