मुख्यमंत्री शिवसेनेचाच, काँग्रेस नेत्याला विश्वास
शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास काँग्रेस नेते आणि आमदार के. सी. पाडवी यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित सरकार स्थापन करतील आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास काँग्रेस नेते आणि आमदार कागडा चांड्या पाडवी म्हणजेच के. सी. पाडवी यांनी (Congress Leader on Shivsena CM) व्यक्त केला आहे.
‘सत्तास्थापनेची प्रक्रिया सुरु आहे. अंतिम निर्णय सकारात्मक असेल. वैयक्तिकरित्या मला असं वाटतं की शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित येऊन सरकार स्थापन करतील आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल’ असा विश्वास के. सी. पाडवी यांनी व्यक्त केला. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी ते बोलत होते.
के. सी. पाडवी हे नंदुरबारमधील अक्कलकुवा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या आमशा पाडवी यांचा पराभव केला होता.
शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर मानलं जातं. सुरुवातीला आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचंही नाव शर्यतीत होतं.
Kagda Chandya Padvi,Congress leader from Maharashtra: Process is still underway,but end result will be positive. Personally I think the three(Shiv Sena-Congress-NCP) parties will form the Govt and a Shiv Sena leader will be the CM. pic.twitter.com/ty7WSwvSHn
— ANI (@ANI) November 12, 2019
शरद पवारांनी काँग्रेससोबतची चर्चा पुढे ढकलल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महासेनाआघाडी सरकार लांबणीवर पडल्याचं चित्र आहे. शरद पवार यांनी चर्चेसाठी आणखी दोन दिवस थांबण्याची विनंती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना केल्यामुळे सरकार स्थापना पुढे ढकलली गेली. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला या संदर्भात माहिती दिली. त्यामुळे चेंडू आता राष्ट्रवादीच्या कोर्टात आला आहे.
‘काँग्रेस कार्यकारिणीची काल दिल्लीत बैठक झाली. नेमकं काय करावं? याचा निर्णय होत नव्हता. महाराष्ट्रातील नेत्यांसोबत सोनिया गांधींनी तीन तास चर्चा केली. त्यानंतर शरद पवारांशीही त्या बोलल्या. दुसऱ्या दिवशी, म्हणजे आज चर्चा करु, गरज पडल्यास शिवसेनेशीही चर्चा करु, असं पवारांनी सांगितल्याची माहिती माणिकराव ठाकरेंनी दिली.
शरद पवारांमुळे पाठिंब्याचं पत्र देण्यास उशिर, माणिकराव ठाकरेंचा दावा
‘आम्ही तयारीत होतो, पण पवारांनी सूचित केल्यामुळे अंतिम निर्णय घेतला नाही. पवारांनी सांगितल्याप्रमाणे दिल्लीतील नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, वेणुगोपाल आज मुंबईला जाणार होते. परंतु आजच्या ऐवजी परवा भेटू, असं नंतर पवारांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेसचे दिल्लीतील नेते आज शरद पवारांची भेट घेणार नाहीत’, असं माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, राष्ट्रवादीला आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलेलं आहे. राष्ट्रवादीकडे आज रात्री 8.30 वाजेपर्यंत सत्तास्थापनेचा दावा करण्याची मुदत आहे. राष्ट्रवादीला काँग्रेस आणि शिवसेना यांचा पाठिंबा मिळवून आकड्यांची जुळवाजुळव करण्यास यश आलं, तर राष्ट्रवादीच्या नेतृत्वात ‘महासेनाआघाडी’ सरकार राज्यात स्थापन होऊ शकतं.
शिवसेनेला काल राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करताना संख्याबळ दाखवता आलं असतं, तर स्थापन झालेल्या ‘महासेनाआघाडी’ सरकारवर शिवसेनेचा वरचष्मा असता. मात्र नेतृत्व स्वतःकडे खेचून घेण्यासाठी शरद पवारांनी लढवलेली शक्कल त्यांच्या राजकीय अनुभवाची चुणूक दाखवणारी आहे, असं राजकीय विश्लेषक (Congress Leader on Shivsena CM) सांगतात.