संयमाने वागावे लागेल, मुख्यमंत्र्यांचा राणेंना सल्ला, तर प्रमोद जठारांना जाहीर आश्वासन
नारायण राणे (Narayan Rane BJP) यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. नितेश राणे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला.
सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्या उपस्थितीत नारायण राणे (Narayan Rane BJP) यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं भाजपमध्ये विलिनीकरण झालं. नारायण राणे (Narayan Rane BJP) यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. नितेश राणे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला.
महाराष्ट्र स्वाभिमान भाजपात विलीन
“आजच्या दिवसांकडे अनेकांच्या नजरा लागून होत्या. राणेंचा प्रवेश कधी असं विचारलं जात होतं? मात्र ते भाजपचे अधिकृत खासदार आहेत. आधी नितेश यांचा भाजप प्रवेश झाला आणि आज निलेश आणि संपूर्ण महाराष्ट स्वाभिमानचा भाजपात प्रवेश झाला हे जाहीर करतो”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राणेंच्या अनुभवाचा फायदा
नारायण राणेंसोबत भरपूर काम केलं. आक्रमक नेता म्हणून काम पाहिले. त्यांनी युवा आमदारांना प्रोत्साहन देण्याचे काम केलं. त्यांचे भरपूर प्रेम मला मिळाले. मध्यंतरी दुरावा आला असेल, पण वैयक्तिक संबंध चांगले राहिले. राणेंच्या नेतृत्वाचा फायदा पक्षविस्ताराला होईल, सरकार चालवायला होईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.
नितेश राणेंना संयमाचा सल्ला
सभागृहात कोकणाचा विषय हिरहिरीने मांडणारे नितेश होते. आक्रमक्तेने मांडले, पण आता आमच्या शाळेत थोडे संयमाने वागावे लागेल, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
आजचं भाकीत लिहून घ्या, एकूण मतं 60 ते 65 टक्के मते नितेश यांना मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रमोद जठार यांना आश्वासन
राणेसाहेब, येत्या 2 वर्षात सी वर्ल्ड प्रकल्पाचे काम सुरु करून दाखवू. प्रमोद जठार तुम्हाला आश्वासन देतो, आपलं सरकार आल्यावर मंत्रिमंडळाची बैठक सिंधुदुर्ग जिल्ह्यात लावू. 1 कोटी रोजगारांमध्ये मोठा वाटा कोकणातल्या युवकाना देऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले.
प्रमोद जठार हे भाजपचे माजी आमदार आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत. प्रमोद जठार यांनी 2009 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी विजय मिळवला. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. कणकवली मतदारसंघात नितेश राणे यांनी 2014 मध्ये प्रमोद जठार यांचा पराभव केला होता.