हिंमत असेल, तर कलम 370 पुन्हा लागू करण्याचं जाहीरनाम्यात सांगा, मोदींचं विरोधकांना आवाहन
हिंमत असेल, तर कलम 370 पुन्हा लागू करु, असं आश्वासन येणाऱ्या निवडणुकांच्या घोषणापत्रात जाहीर करा, असं आवाहन नरेंद्र मोदींनी विरोधकांना केलं.
जळगाव : काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही काँग्रेस पक्ष पाकधार्जिणे आहेत, हिंमत असेल, तर कलम 370 पुन्हा लागू करु, असं निवडणुकांच्या घोषणापत्रात जाहीर करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावातील सभेत (Narendra Modi in Jalgaon) विरोधकांना केलं. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आयोजित केलेल्या पहिल्याच सभेत मोदींनी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महायुती सरकार स्थापन करण्याचा विश्वास व्यक्त केला.
‘कसं काय जळगाव?’ असा प्रश्न विचारत नरेंद्र मोदींनी नेहमीच्या शैलीत मराठीतून भाषणाला सुरुवात केली. ‘येत्या पाच वर्षांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारसाठी पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. लोकसभा निवडणुकीवेळी दिलेल्या आशीर्वादाचे आभारही व्यक्त करायचे आहेत’ असं मोदी यावेळी म्हणाले.
5 ऑगस्टला भाजप आणि एनडीए सरकारने अभूतपूर्व निर्णय घेतला. जम्मू काश्मीरमधील गरीब, महिला यांच्या विकासासाठी एक पाऊल उचलण्यात आलं. जम्मू काश्मीर आणि लडाख हा फक्त जमिनीचा एक तुकडा नाही, तर भारतमातेचं शीर आहे, असं मोदी म्हणाले.
शिवसेना उमेदवार गुलाबराव पाटलांची सटकली, गिरीश महाजनांसमोर संताप
दुर्दैवाने आपल्या देशातील काही राजकीय पक्ष आणि नेते राष्ट्रहितासाठी घेतलेल्या या निर्णयावरुन राजकारण करण्यात गुंतले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाषणं बघा. जम्मू-काश्मीरविषयी देशाला जे वाटतं, त्याच्या विरुद्ध यांचे विचार आहेत. शेजारी देशांशी यांची मतं मिळती-जुळती आहेत, असा निशाणा नरेंद्र मोदी यांनी (Narendra Modi in Jalgaon) साधला.
हिंमत असेल, तर कलम 370 पुन्हा लागू करु, असं आगामी किंवा त्यानंतर येणाऱ्या निवडणुकांच्या घोषणापत्रात जाहीर करा, असं आवाहनही नरेंद्र मोदींनी विरोधकांना केलं.
गेल्या पाच वर्षांतील आमच्या कामगिरीमुळे विरोधकही हैराण आहेत. शिवसेना-भाजप नेतृत्वातील सरकार चैतन्यशील असल्याचं त्यांनाही पटलं आहे, अशा टोला मोदींनी लगावला.
‘नव्या भारताचा नवा जोश जगाला दाखवायचा आहे. जगभरात भारताचा डंका वाजण्यामागे 130 कोटी देशवासियांचे हात आहेत. भारताचा आवाज जगभरात ताकदीने ऐकला जात आहे. प्रत्येक देश भारताच्या साथीने उभा आहे. आपल्या खांद्याला खांदा लावून पुढे जाण्यासाठी उत्साही आहे.’ असंही मोदी म्हणाले.