चार दिवसांपासून नॉट रिचेबल अजित पवार अखेर सापडले!
आपण पाडव्याला सर्वांची भेट घेण्यासाठी आलो आहोत. कालही पवार कुटुंबासोबत बारामतीत होतो, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
बारामती : बारामतीमधून सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवणारे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार गेल्या काही दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ (Not reachable Ajit Pawar found) होते. गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा अजित पवार अचानक संपर्काबाहेर गेल्याने चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आपण बारामतीत पवार कुटुंबासोबत वेळ घालवत होतो, असं खुद्द अजित पवार यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधताना सांगितलं.
निकाल लागून चार दिवस उलटल्यानंतरही अजित पवार माध्यमांसमोर आलेले नव्हते. त्यांनी एकही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. त्यामुळे अजित पवार पुन्हा नाराज झाले आहेत का, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.
‘आपण पाडव्याला सर्वांची भेट घेण्यासाठी आलो आहोत. कालही पवार कुटुंबासोबत बारामतीत होतो. आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले नेते, कार्यकर्ते, हितचिंतक या सर्वांना भेटणार आहे’ असं अजित पवार यांनी सांगितलं.
अंडर करंट होता हे निकालावरुन दिसत आहे. शिवसेना आणि भाजप यांनी सत्तेसाठी काय करावं, हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. राष्ट्रवादीला सोडून गेलेले निम्मे ‘पैलवान’ पडले, तर निम्मे जिंकले. जे पराभूत झाले, त्यांनी आत्मपरीक्षण करावं. मतदारराजा काहीही करु शकतो, असं मत अजित पवार यांनी व्यक्त (Not reachable Ajit Pawar found) केलं.
कधी होते नॉट रिचेबल?
24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. 25 तारखेला रोहित पवारांनी शरद पवारांना भेटून आशीर्वाद घेतला, मात्र तिथंही अजित पवार उपस्थित नव्हते. 26 तारखेला बाळासाहेब थोरांतांनीही पवारांची भेट घेतली.मात्र तिथे फक्त रोहित पवार, सुप्रिया सुळे दिसल्या, अजित पवार तिथंही नव्हते.
राष्ट्रवादीनं प्रतिकूल परिस्थितीतही चांगल्या जागा मिळवल्या. मात्र अजित पवार कुठे आहेत, असा प्रश्न शरद पवारांनाही केला गेला. तेव्हा पवारांनीही उत्तर देणं टाळलं होतं.
बारामतीत अजित पवारांचा डंका, पडळकरांसह सर्वांचंच डिपॉझिट जप्त
राज्यात सर्वाधिक मताधिक्क्यानं जिंकलेले अजित पवार निकालाच्या दिवशीही पुढे आले नव्हते. त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनीच जनतेचे आभार मानले होते. महत्त्वाचं म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून अजित पवार कुठं आहेत, याच्या बातम्या सुरु होत्या. परंतु त्यावर त्यांनी कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तरही दिलेलं नव्हतं. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा दिवसेंदिवस जोर धरत होत्या. अखेर, अजित पवार माध्यमांसमोर आल्याने चर्चांचा धुरळा खाली बसण्याची शक्यता आहे (Not reachable Ajit Pawar found)
अजित पवारांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह उर्वरित सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव केला. पडळकरांसह सर्वच उमेदवारांचं अगदी डिपॉझिट देखील जप्त झालं आहे.