आघाडीचं संभाव्य खातेवाटप : थोरातांना महसूल, भुजबळ-आव्हाडांना काय?
अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद किंवा गृहमंत्रिपद, तर जयंत पाटील यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची चिन्हं आहेत.
मुंबई : ‘महासेनाआघाडी’ सरकार दृष्टीक्षेपात असून येत्या दोन ते तीन दिवसात सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नेत्यांचं संभाव्य खातेवाटप समोर आलेलं आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गळ्यात पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची चिन्हं (Possible Ministry List of Congress NCP) आहेत.
अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद किंवा गृहमंत्रिपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची चिन्हं आहेत. तर कळवा मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना वैद्यकीय शिक्षण मंत्रालय सुपूर्द केलं जाण्याची शक्यता आहे.
नवाब मलिक यांना कामगार मंत्रालय मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना महसूल खात्याचा कारभार दिला जाण्याचे संकेत आहेत. याशिवाय विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, के. सी. पाडवी या काँग्रेस आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
चर्चा आणि आराखडे
मुख्यमंत्रिपद जर शिवसेनेला पाच वर्षांसाठी दिलं, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद पाच वर्ष पूर्णवेळ मिळेल. उपमुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची नावं चर्चेत आहेत.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे
अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद जर राष्ट्रवादी-शिवसेनेत विभागलं गेलं, तर काँग्रेसचा उपमुख्यमंत्री पाच वर्ष पूर्णवेळ राहील, अशी चर्चा आहे.
खातेवाटपाचे काय?
महाविकासआघाडीमध्ये खातेवाटप सर्वांच्या सहमतीने होण्याची शक्यता
महत्त्वाची चार खाती प्रत्येक पक्षाला वाटून देणार
ग्रामीण भागाशी संबंधित खाती प्रत्येकी एका पक्षाच्या वाट्याला येऊ शकतात
गृह, अर्थ, उद्योग एका पक्षाकडे असण्याची शक्यता (राष्ट्रवादी)
महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि ऊर्जा दुसऱ्या पक्षाकडे असण्याची शक्यता (काँग्रेस)
नगरविकास, जलसंपदा, MSRDC तिसऱ्या पक्षाला दिलं जाण्याची शक्यता (शिवसेना)
ग्रामीण भागाशी संबंधित कृषी, सहकार, ग्राम विकास ही खाती प्रत्येकी एका पक्षाला मिळू शकतात
दरम्यान, पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार, असं खासदार संजय राऊत निक्षून सांगत असतानाच आता राष्ट्रवादीकडूनही अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा आग्रह होताना दिसत आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची चर्चा अद्याप झालेली नाही, परंतु अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीलाही मिळावं, अशी मागणी असल्याचं राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीला शिवसेनापेक्षा दोनच जागा कमी मिळाल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीलाही मिळावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याबाबत आजच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे, सुनिल तटकरे यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. सत्तास्थापनेचा दावा करण्याची तारीख अद्याप निश्चित नसल्याचं तटकरेंनी (Possible Ministry List of Congress NCP) सांगितलं.