शरद पवारांमुळे पाठिंब्याचं पत्र देण्यास उशिर, माणिकराव ठाकरेंचा दावा
शरद पवारांनी चर्चेसाठी दोन दिवस थांबण्याची विनंती सोनिया गांधी यांना केल्यामुळे सरकार स्थापना पुढे ढकलली
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘किंगमेकर’ म्हटलं जातं, त्यात काही वावगं नाही. शरद पवारांनी काँग्रेससोबतची चर्चा पुढे ढकलल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महासेनाआघाडी सरकार लांबणीवर पडल्याचं चित्र आहे. शरद पवार यांनी चर्चेसाठी आणखी दोन दिवस थांबण्याची विनंती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना (Sharad Pawar stopped Congress from Supporting) केल्यामुळे सरकार स्थापना पुढे ढकलली गेली. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला या संदर्भात माहिती दिली. त्यामुळे चेंडू आता राष्ट्रवादीच्या कोर्टात आला आहे.
‘काँग्रेस कार्यकारिणीची काल दिल्लीत बैठक झाली. नेमकं काय करावं? याचा निर्णय होत नव्हता. महाराष्ट्रातील नेत्यांसोबत सोनिया गांधींनी तीन तास चर्चा केली. त्यानंतर शरद पवारांशीही त्या बोलल्या. दुसऱ्या दिवशी, म्हणजे आज चर्चा करु, गरज पडल्यास शिवसेनेशीही चर्चा करु, असं पवारांनी सांगितल्याची माहिती माणिकराव ठाकरेंनी दिली.
‘आम्ही तयारीत होतो, पण पवारांनी सूचित केल्यामुळे अंतिम निर्णय घेतला नाही. पवारांनी सांगितल्याप्रमाणे दिल्लीतील नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, वेणुगोपाल आज मुंबईला जाणार होते. परंतु आजच्या ऐवजी परवा भेटू, असं नंतर पवारांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेसचे दिल्लीतील नेते आज शरद पवारांची भेट घेणार नाहीत’, असं माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
खातेवाटप आणि भागीदारीमुळे काँग्रेसचं शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र नाही?
दरम्यान, राष्ट्रवादीला आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलेलं आहे. राष्ट्रवादीकडे आज रात्री 8.30 वाजेपर्यंत सत्तास्थापनेचा दावा करण्याची मुदत आहे. राष्ट्रवादीला काँग्रेस आणि शिवसेना यांचा पाठिंबा मिळवून आकड्यांची जुळवाजुळव करण्यास यश आलं, तर राष्ट्रवादीच्या नेतृत्वात ‘महासेनाआघाडी’ सरकार राज्यात स्थापन होऊ शकतं.
शिवसेनेला काल राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करताना संख्याबळ दाखवता आलं असतं, तर स्थापन झालेल्या ‘महासेनाआघाडी’ सरकारवर शिवसेनेचा वरचष्मा असता. मात्र नेतृत्व स्वतःकडे खेचून घेण्यासाठी शरद पवारांनी लढवलेली शक्कल त्यांच्या राजकीय अनुभवाची चुणूक दाखवणारी (Sharad Pawar stopped Congress from Supporting) आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात.