उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा, ‘मातोश्री’बाहेर पोस्टरबाजी
शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणे ही महाराष्ट्राची गरज आहे, असे पोस्टर्स 'मातोश्री'जवळ लागले आहेत
मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरुन झाल्यानंतर शिवसैनिकांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. ‘मातोश्री’ परिसरात पोस्टरबाजी करुन शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्रिपदावर (Uddhav Thackeray for CM) विराजमान करण्याचा जोर धरला आहे.
काय लिहिलं आहे पोस्टरवर?
शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही शिवसैनिकांची इच्छा आहे. शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणे ही महाराष्ट्राची गरज आहे – आपला नम्र शिवसैनिक
शिवसेना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे. परंतु शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी वारंवार होते. त्याचप्रमाणे गटनेतेपदी निवडलेले गेलेले एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्याही नावाची चर्चा होताना दिसते.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल चढवला होता. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांचाही संताप पाहायला मिळाला.
‘चर्चेत आम्हाला उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यासाठी मी लाचार नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचं वचन दिलं होतं. ते मी पूर्ण करणार. त्याच्यासाठी भाजप, अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही.’ असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
आदित्य ठाकरे रात्री उशिरा आमदारांच्या भेटीला, चर्चेनंतर हॉटेलमध्येच मुक्काम
‘शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत बसून चर्चा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली. फडणवीस यांनी आत्ता जाहीर करु नका, वेळ आली की मी माझ्या पक्षाला सांगेन, असं म्हटलं. तसेच आत्ता सांगितलं तर पक्षात माझी अडचण होईल असं नमूद केलं होतं. ते शब्दखेळ करण्यात हुशार आहेत. त्याचा अनुभव मी आत्ता घेतला.’ असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला होता.
मी खोटारडा म्हणून शिवसैनिकांसमोर जाऊ शकत नाही. जमत नाही असं म्हटलं तर एकवेळ ठीक आहे. पण ठरलंच नाही, हा आरोपी मी सहन करणार नाही. खोटं बोलण्याचा हिशोब काढला तर अच्छे दिन, नोटबंदीपासून कोण खोटं बोललं हे दिसेल, असा संतापही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला (Uddhav Thackeray for CM) होता.