‘पुढचंसुद्धा सरकार आपलंच आणि पुढचे….’ मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंचा सूचक पॉझ!
'पुढचंसुद्धा सरकार आपलंच, आणि पुढचे.... काय बोलायचं ते तुम्हाला कळलं असेल' असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी मुंबई सेंट्रल बस आगाराच्या पुनर्विकासाच्या भूमिपूजन सोहळ्यात केलं. यामुळे उद्धव यांच्या मनातले मुख्यमंत्री आदित्य ठाकरे आहेत की देवेंद्र फडणवीस हा प्रश्न उपस्थित झाला आहे
मुंबई : ‘पुढचंसुद्धा सरकार आपलंच आणि पुढचे…. काय बोलायचं ते तुम्हाला कळलं असेल’ असं सूचक वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरेंच्या मनातला मुख्यमंत्री सुपुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आहेत, की देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे मात्र गुलदस्त्यात आहे.
एकीकडे, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच असणार, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) वारंवार व्यक्त करताना दिसतात. तर दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवून मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान व्हावं, ही शिवसैनिकांसह शिवसेनेतील काही नेत्यांचीही इच्छा आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी सूचक मौन बाळगत चर्चांना वाव दिला आहे.
मुंबई सेंट्रल बस आगाराच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन आणि विद्युत बसच्या लोकार्पण सोहळ्याला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली होती. त्यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या कामाची स्तुती करताना उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं.
‘पुढचंसुद्धा सरकार आपलंच’ असं म्हणून उद्धव ठाकरे थोडेसे थांबले. त्यानंतर ‘आणि पुढचे….’ असं वाक्य उच्चारायला सुरुवात करत त्यांनी पुन्हा ‘पॉझ’ घेतला. काय बोलायचं ते तुम्हाला कळलं असेल, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चेंडू उपस्थितांकडे टोलवला. मात्र त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी सुरु केली.
जागावाटपाचं घोडं
जागावाटपाचं ठरलंय असं उद्धव ठाकरे वारंवार सांगत असले, तरी जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरुन आता वादाला सुरुवात झाल्याचं चित्र आहे. कारण पहिल्याच बैठकीत भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे जागा वाटपाचं कसं ठरणार? हा सवाल विचारण्याची वेळ आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेला 100 जागा देण्यास भाजपने तयारी दर्शवली आहे. तर शिवसेनेला 144 /144 चा फॉर्म्युला हवा आहे. तसंच मित्रपक्षांना भाजपच्याच कोट्यातून जागा देण्याची मागणी शिवसेनेने केल्याचीही माहिती आहे.
नुकत्याच केलेल्या अंतर्गत सर्व्हेतून भाजपच्या आशा आणखी वाढल्या आहेत. कारण, भाजप किमान 160 जागांवर जिंकेल असा अहवाल समोर आलाय. त्यामुळे 160 पेक्षा अधिक जागा लढवण्यावर भाजपचा जोर आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना आता अडून बसली आहे.
आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा शिवसेना आमदार अनिल परब यांनी बोलून दाखवल्यानंतर युवासेनेला स्फुरण चढलं आहे. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी पोस्टरबाजी करण्यात येत आहे.
सध्या सुरु असलेल्या आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेतही अनेक जण त्यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह करत आहेत. आदित्य ठाकरे यांना अनेकदा निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न विचारले आहेत. पूर्ण महाराष्ट्र माझा मतदारसंघ आहे, जनतेने आदेश दिल्यास नक्की लढेन, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर हात जोडून सूचक मौन बाळगलं होतं.
शिवसेना आणि भाजप यांनी स्वबळाची चाचपणीही केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपद आणि जागावाटपावरुन ‘आमचं ठरलंय’ सांगणाऱ्या युतीमध्ये धुसफूस होणार, की शांतपणे तोडगा निघणार, हे येणारा काळच ठरवेल.