Akola : मराठवाड्यानंतर विदर्भातही केळी बागा आडव्या, पहिल्याच पावसामध्ये बदलले चित्र
केळी हे बारमाहीचे पीक असले तरी बदलत्या वातावरणामुळे यंदा केळीचे दर घसरलेले आहेत. इतर फळांच्या उत्पादनाचा परिणाम केळीच्या दरावर झालेला आहे. अपेक्षित दर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी केळीच्या बागा मोडल्या पण उर्वरीत क्षेत्रातील बागा आता वादळी वाऱ्यामुळे आडव्या झाल्या आहेत.
अकोला : (Kharif Season) खरीप हंगामातील पेरणीचा श्रीगणेशा कऱण्यासाठी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. उशीरा का होईना पावसाने हजेरी लावली असली तरी पावसाबरोबर सोसाट्याच्या वाऱ्याने मोठे नुकसान होत आहे. गतआठवड्यात मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात तोडणीला आलेल्या (Banana garden) केळी बागा आडव्या झाल्या होत्या तर आता अकोला जिल्ह्यात केळी बागाचे नुकसान झाले आहे. (Akola) जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये जवळपास 100 ते 150 हेक्टरावरील केळी आडवी झाली आहे. आता काढणी काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच झालेले नुकसान न भरुन निघण्यासारखे आहे. पहिल्या पावसाने जिल्ह्यातील चित्र बदलले असले तरी केळी उत्पादकांना नुकसानीच्या झळा सहन कराव्या लागल्या आहेत.
घटत्या दराची चिंता त्यामध्येच न भरुन निघणारे नुकसान
केळी हे बारमाहीचे पीक असले तरी बदलत्या वातावरणामुळे यंदा केळीचे दर घसरलेले आहेत. इतर फळांच्या उत्पादनाचा परिणाम केळीच्या दरावर झालेला आहे. अपेक्षित दर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी केळीच्या बागा मोडल्या पण उर्वरीत क्षेत्रातील बागा आता वादळी वाऱ्यामुळे आडव्या झाल्या आहेत. शिवाय केळी तोडणी तोंडावर असतानाच निसर्गाची अवकृपा झाली आणि एका रात्रीतून होत्याचे नव्हते झाले आहे.
नुकसानभरपाईची मागणी
केळी बागांना हंगामाच्या सुरवातीपासूनच फटका बसलेला आहे. यापूर्वी अवकाळी पावसामुळे रोगराईचा प्रादुर्भावामुळे उत्पादनाच घट झाली होती तर काढणीच्या दरम्यान दर घटले. दुसरे हे फळपिक जोपासण्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी हजारो खर्च केला होता. त्यामुळे आता कुठे अपेक्षित उत्पन्न पदरी पडेल अशी आशा असतानाच शुक्रवारी वादळी वाऱ्यामुळे तेल्हारा, अकोट तालुक्यातील बागा ह्या आडव्या झाल्या आहेत. केळीसकट बागा जमिनदोस्त झाल्याने आता प्रशासनानेच पंचनामे करुन मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.दानापुरात तर 100 हेक्टरावरील केळीबागा आडव्या झाल्या आहेत.
पावसामुळे खरिपाचा मार्ग सुखकर
पाऊस हा अवकाळी असो की हंगामातला नुकसान मात्र, फळपिकांचे हे ठरलेलेच आहे. यापूर्वी अवकाळी पावसामुळे आंबा, द्राक्ष या फळपिकांचे नुकसान झाले होते तर आता केळी बागा आडव्या झाल्या आहेत. त्यामुळे फळबागांमधून अधिकचे उत्पादन तर सोडाच पण झालेला खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. मात्र, पावसाच्या आगमनामुळे खरिपातील रखडलेल्या पेरणी कामांना वेग येणार आहे. खरीपपूर्व मशागतीची कामे तर झाली आहेत अपेक्षित पाऊस झाला की चाढ्यावर मूठ धरायला शेतकरी मोकळा होणार आहे.