Animal feed : पीक पेरणीबरोबर करा हिरव्या चाऱ्याचेही नियोजन, वेळीच निर्णय घेतला तर चाऱ्याची समस्या मिटणार
जनावरांसाठी जो पौष्ठिक चारा आहे त्याचीच लागवड केली तर अधिकचे फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे एकदल हिरव्या चाऱ्यामध्ये हत्ती गवत, मका, ज्वारी, बाजरी, कडवळ, गिनी गवत, धारवाड हायब्रीड याचा समावेश होतो. या एकदल चाऱ्यामध्ये प्रथिने कमी आणि पिष्टमय पदार्थ अधिक असतात.
लातूर : सध्या (Kharif Season) खरीप हंगामातील पेरणीची लगबग सुरु आहे. पाऊस लांबणीवर गेला असला तरी शेतकऱ्यांनी सर्वतोपरी तयारी केली असून आता वरुणराजाने हजेरी लावली की, चाढ्यावर मूठ ही ठरलेली आहे. खरिपात (Main Crop) मुख्य पिकांचा विचार केला जातो पण (Animal Feed) चारा पिकाला म्हणावे तेवढे महत्व दिले जात नाही. त्यामुळे प्रतिकूल परस्थितीमध्ये अधिकच्या किंमतीने चारा घेऊन जनावरे जोपासावी लागतात. मात्र, सध्याच्या पोषक वातावरणात जर इतर पिकांबरोबर चाऱ्याचा विचार केला तर भविष्यातील चिंता मिटणार आहे. पशूंच्या चाऱ्यामध्ये हिरव्या चाऱ्याचे मोठे महत्व आहे. त्यामुळे जनावरांची संख्या, जमिनीचा दर्जा आणि पाण्याची उपलब्धता पाहून चारा पिके घेण्याचा सल्ला पशू अभ्यासक प्रतीक साबे यांनी दिला आहे.
अशी करा चाऱ्याची निवड..
जनावरांसाठी जो पौष्ठिक चारा आहे त्याचीच लागवड केली तर अधिकचे फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे एकदल हिरव्या चाऱ्यामध्ये हत्ती गवत, मका, ज्वारी, बाजरी, कडवळ, गिनी गवत, धारवाड हायब्रीड याचा समावेश होतो. या एकदल चाऱ्यामध्ये प्रथिने कमी आणि पिष्टमय पदार्थ अधिक असतात. तर द्विदल चारा पिकांमध्ये लसून घास, चवळी, स्टायलो, दशरथ गवत याचा समावेश होतो. हा चारा अधिक पौष्ठिक असतो तर प्रथिनेही अधिक असते. तर ही चारापिके शेताच्या बांधावरही शेवरी, हादगा, सुबाभुळ या वृक्षातूनही झाडपाला उपलब्ध होतो.
चाऱ्याचे प्रमाणे असे ठेवा
दूधाच्या प्रमाणावरून चारा ठरविला जातो. यामध्ये 10 लिटर दूध देणाऱ्या गाईला 15 ते 20 किलो हिरवा तर 5 ते 6 किलो वाळेलेला चारा व 4 किलो खुराक असे त्याचे प्रमाण आहे. तर लहान जनावराला प्रतिदिन हिरवा चारा 3 ते 4 किलो, वाळलेला 1 ते 2 किलो आणि त्यासोबत खुराकही फायद्याचा ठरतो.
असे आहे हिरव्या चाऱ्याचे महत्व
वाळलेल्या चाऱ्यामध्ये जे प्रथिने, कॅल्शिअम ह्या जीवनसत्वांचे कमी असते त्याची कसर हिरव्या चाऱ्यातून भरुन काढता येते. हिरव्या चाऱ्यामुळे दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत तर होतेच पण आरोग्यही चांगले राहते. जनावरांच्या शरिरातील पाण्याचे प्रमाणाचा समतोलही राखला जातो. त्यामुळे संभाव्य रोगाचा धोका हा कमी होतो. हिरव्या चाऱ्यामुळे तापमान नियंत्रणात राहिल्याने शरिरावर ताणही येत नाही.तर इतर चाऱ्यावर होणारा खर्च या हिरव्या चाऱ्यामुळे कमी होतो.
(सदरील माहिती पशू अभ्यासक प्रतीक साबे पाटील यांनी दिली असून शेतकऱ्यांनी चारा लागवड करताना कृषी अधिकाऱ्यांचेही मार्गदर्शन घ्यावे.)