अतिवृष्टीचे अनुदान बॅंकेत, आता वितरणापूर्वी शेतकऱ्यांना ‘एटीएम’ कार्डचे होणार वाटप
नांदेड जिल्ह्यात लाख शेतकऱ्यांच्या 406 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून आता जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांना एटीएम वाटपाचा निर्णय घेतलेला आहे.
नांदेड : अतिवृष्टीचे अनुदान दिवाळी सणात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याच्या अनुशंगाने राज्य सरकारने नियोजन केले होते. मात्र, आता डिसेंबर उजाडला असून आता अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. नांदेड जिल्ह्यात 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 406 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून आता जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांना एटीएम वाटपाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे बॅंक कर्मचारी हे गावोगावत जाऊन या कार्डचे वाटप करणार आहेत. तर उर्वरीत मराठवाड्यात अणखीन अनुदानाची काही रक्कम ही प्रक्रियेत अडकलेली आहे.
7 लाख शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा लाभ
खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ऐन सणामध्येच शेतकरी हे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले होते. त्यामुळे दिवाळी सणात शेतकऱ्यांना पैसे मिळावेत असा आग्रह राज्य सरकारने घेतला होता. पण प्रक्रियेतच ही अनुदानाची रक्कम अडकली होती. अखेर उशिरा का होईना नांदेड जिल्ह्यातील 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 406 कोटी 14 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. शिवाय अनुदान वाटपाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. शिवाय बॅंकेत शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून आता गावस्तरावर शेतकऱ्यांना एटीएम कार्ड वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे.
इतर सातही जिल्ह्यात अनुदानाची रक्कम ही प्रक्रियेतच
मराठवाड्यातील नांदेड जिल्हा वगळता इतर सातही जिल्ह्यांमध्ये अनुदानाची रक्कम ही टप्प्याटप्प्याने बॅंकेत जमा होत आहे. तांत्रिक अडचणीमुळे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी पिक नुकसानीचे दावे केले होते. त्याबाबत विमा कंपनीने तत्परता बाळगलेली नाही. तर नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र, शेतकऱ्यांचे दावे निकालात काढण्याचे आदेश दिले होते. त्यामुळेच पूर्ण क्षमतेने निधी जमा झाला असून त्याचे प्रत्यक्षात वितरणही होत आहे. केवळ धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा धनादेश हा 4 डिसेंबर रोजी जिल्हा बॅंकेला मिळालेला आहे. अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही त्यांना आठवड्याभराची प्रतिक्षा ही करावी लागणार आहे.
…म्हणून एटीएम कार्डचा वाटपाचा निर्णय
जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर ही अनुदानाची रक्कम जमा झालेली आहे. मराठावाड्यात सर्वात आगोदर पूर्ण रक्कम ही नांदेड जिल्ह्यातच झालेली आहे. त्यामुळे आता पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांची एकच गर्दी होणार आहे. शिवाय कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही. सार्वजनिक मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते म्हणून शेतकऱ्यांना बॅंकेचे कर्मचारी हेच एटीएम कार्डचे वाटप करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची सोयही होणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांना एटीएम मिळण्यास काही अडचणी उद्भवतील अशा शेतकऱ्यांना बॅंकेतूनच पैसे अदा केले जाणार आहेत.