Sugarcane : अतिरिक्त ऊस प्रश्नावरुन भाजप ‘फडात’, साखर आयुक्त कार्यालयासमोरच आंदोलन
राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही तर साखर कारखान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. केवळ नियोजन नसल्यामुळे यंदा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. असे असताना त्याचे गाळपच झाले नाही तर शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत तर वाया जाणारच आहे पण झालेला खर्चाचे काय असा सवाल भाजपा किसान मोर्चाने उपस्थित केला आहे.
पुणे : ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला तरी राज्यात (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आतापर्यंत शेतकरी संघटना, शेतकरी हे मैदानात उतरले होते. पण राज्यात अजूनही अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे. याकरिता वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या असल्या तरी (Marathwada) मराठवाड्यात अजूनही 50 हजार हेक्टरावर ऊस गाळपाविना शिल्लक आहे. (Farmer) शेतकरी नैसर्गिक संकटामुळे मेटाकुटीला आला असतानाच राज्यात रखडलेल्या ऊसतोडीमुळे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यासाठी भाजप किसान मोर्चाच्या वतीने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कार्यालयासमोरच बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. सर्वस्तरातून शिल्लक ऊसाबाबत सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता तरी हा प्रश्न मार्गी लागेल का नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्य सरकार साखर सम्राटांच्या पाठीशी
राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही तर साखर कारखान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. केवळ नियोजन नसल्यामुळे यंदा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. असे असताना त्याचे गाळपच झाले नाही तर शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत तर वाया जाणारच आहे पण झालेला खर्चाचे काय असा सवाल भाजपा किसान मोर्चाने उपस्थित केला आहे. शिवाय एफआरपी रक्कम ही दोन टप्प्यातच देण्याच्या अनुशंगाने अतिरिक्त उसाची समस्या अधिक तीव्र केली जात असल्याचा आरोप यावेळी माजी आ. राम शिंदे यांनी केला आहे. शिवाय त्यांच्या नेतृत्वामध्ये हे धरणे आंदोलन सुरु आहे.
योग्य नियोजन हाच एकमेव मार्ग
गाळप हंगाम सुरु होऊन 6 महिने उलटले आहेत. असे असतानाही पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्यात सर्वत्र अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या उपाययोजना प्रशासन आणि राज्य सरकारने समोर ठेवल्या पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीच झाली नाही. त्यामुळे मे महिना निम्म्यावर येथ असतानाही अतिरिक्त उसाचा प्रश्न शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे. त्यामुळे साखर आयुक्त कार्यालयानेच राज्यातील अतिरिक्त उसाची आकडेवारी घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
शेतकरी, शेतकरी संघटनेनंतर आता भाजपा मैदानात
निर्धारित कालावधी संपलेला असतानाही फडात ऊस हा उभाच आहे. त्यामुळे उत्पादनात घट तर होणारच आहे पण उभा असलेला ऊस कारखान्यावर जातो की नाही अशी स्थिती आहे. हा प्रश्न घेऊन आतापर्यंत शेतकऱ्यांनी संबंधित कारखाना आणि साखर आय़ुक्त यांना निवेदने दिली आहेत. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही याकरिता लढा उभा केला होता. असे असताना आता अंतिम टप्प्यात भाजप किसान मोर्चाने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आतापर्यंच विविध उपाययोजना राबवल्या तरी मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस हा उभाच आहे.