PM Kisan | केव्हा जमा होणार पीएम किसानचा हप्ता, लाभार्थ्यांची यादी तपासली का?
PM Kisan | दोन महिन्यांपूर्वी 14 वा हप्ता जमा झाल्यानंतर आता लाभार्थ्यांना पुढील हप्त्याची ओढ लागली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मात्र काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहे. नाहीतर त्यांना फटका बसू शकतो. अनेक लाभार्थ्यांचे नाव यादीत वगळल्याचे समोर आले आहे.
नवी दिल्ली | 25 ऑक्टोबर 2023 : लाभार्थी शेतकरी सध्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 15 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. यापूर्वी केंद्र सरकारने या 27 जुलै रोजी 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. त्यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता जमा करण्यात आला. तर ऑक्टोबर 2022 मध्ये 12 वा हप्ता जमा करण्यात आला होता. म्हणजे प्रत्येक हप्त्यात जवळपास पाच महिन्यांचे अंतर असल्याचे दिसून येते. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये जमा करण्यात येतात. यापूर्वी DBT माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. 8.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 2.50 लाख कोटी रुपयांची धनराशी जमा करण्यात आली.
या शेतकऱ्यांना नाही लाभ
ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील वा सेवानिवृत्त असतील त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. 10 हजार रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना या योजनेचा फायदा मिळत नाही. इनकम टॅक्स जमा करणाऱ्यांना या योजनेच्या बाहेर ठेवण्यात आले आहे.
लाभार्थ्यांचे असे तपासा नाव
लवकरच 15 वा हप्ता जमा होणार आहे. या यादीत नाव आहे की नाही ते शेतकऱ्यांनी तपासावे. त्यासाठी pmkisan.gov.in वर लॉगईन करा.या ठिकाणी लाभार्थ्यांची यादी दिसेल. त्यावर क्लिक करा. तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव, तुमच्या नावाचा तपशील द्या. त्यानंतर यादीसमोर येईल, त्यात तुमचे नाव शोधा. योजनेच्या यादीत तुमचे नाव असेल तर हप्ता जमा होईल.
ई-केवायसी कशी करणार
- पीएम किसान मोबाईल एपवर, फेस ऑथेंटिकेशन फीचर येते.
- याठिकाणी शेतकरी घरबसल्या ई-केवायसी करता येते.
- त्यासाठी फिंगरप्रिंट आणि ओटीपी गरज नसेल.
ही प्रक्रिया पूर्ण करा
या योजनेत या गोष्टींची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानुसार, भुलेख पडताळणी अथवा केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर त्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यांचा हप्ता थांबविण्यात येऊ शकतो.
कधी जमा होईल हप्ता
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. ही रक्कम तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. प्रत्येक टप्प्यात 2000 रुपयांची मदत देण्यात येते. दर चार महिन्यांनी हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. आता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 15 वा हप्ता जमा होईल, अशी शक्यता आहे.