कोरोनामुळे महागला ‘मालावी हापूस’चा गोडवा, रत्नगिरीतला हापूस कसा झाला ‘मालावी’?
पुणेकरांसाठी हापूस प्रमाणेच गोड, रसाळ गुणधर्म असलेला आंबा थेट दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी येथून दाखल झालेला आहे. हा मालावी आंबा पुणेकरांच्या पसंतीस उतरला असला तरी कोरोनामुळे या आंब्याचा गोडावा महागला आहे. कोरोनामुळे विमान फेऱ्यांवर मर्यादा आल्याने एका डझनसाठी पुणेकरांना तब्बल 4 हजार रुपये मोजावे लागत आहेत.
पुणे : हिवाळ्याला सुरवात झाली की कोकणचा राजा असलेल्या हापूसचे मार्केटमध्ये आगमन होते. मात्र, यंदा पावसामुळे कोकणचा हापूस उशिराने मार्केटमध्ये दाखल होणार आहे. पण पुणेकरांसाठी (Hapus Mango) हापूस प्रमाणेच गोड, रसाळ गुणधर्म असलेला आंबा थेट (South Africa Section) दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी येथून दाखल झालेला आहे. हा मालावी आंबा पुणेकरांच्या पसंतीस उतरला असला तरी कोरोनामुळे या आंब्याचा गोडावा महागला आहे. कोरोनामुळे विमान फेऱ्यांवर मर्यादा आल्याने एका डझनसाठी पुणेकरांना तब्बल 4 हजार रुपये मोजावे लागत आहेत.
सततचा पाऊस आणि वातावरणातील बदलाचा परिणाम कोकणातील हापूसच्या आंब्यावरही झाला आहे. ऐन मोहर लागण्याच्या वेळीच नोव्हेंबरच्या सुरवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे मोहर गळती झाली आहे तर आता दमट वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे दोन दिवसातून एकदा किडनाशकाची फवारणी करण्याची नामुष्की फळबागायतदारांवर ओढावली आहे. त्यामुळे यंदा कोकणचा राजा असलेला हापूस बाजार पेठेते उशिराने दाखल होणार आहे. तर यंदाच्या हंगाम केवळ 70 दिवसांचा राहणार आहे.
मालावी हापूस आंब्याची वैशिष्ट्ये
मालावी हापूस हा दक्षिण अफ्रिका खंडातला असला तरी मुळ रोप हे कोकणातीच आहे. हा आंबा मधुर, स्निग्ध, सुखदायक असला तरी पचायला जड आहे. यामध्ये कॅल्शिअम, लोह, फॅास्फरस, ‘क’ जीवनसत्व तसेच तंतुमय पदार्थ, आर्द्रता, मेद, पिष्टमय पदार्थ हे घटकद्रव्ये आहेत. कोकणच्या हापूस प्रमाणे याची रचना आहे. सध्या कोकणातील आंबा बाजारपेठेत दाखल झालेला नाही. मात्र, मालावी येथील आंबा पुणेकरांसाठी उपलब्ध झाला आहे. मात्र, त्याच्या दरात कमालीची वाढ झाली असून इतर आंब्याची आवक होईपर्यंत असेच दर राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
रत्नागिरी ते दक्षिण अफ्रिका खंड असा आहे आंब्याचा प्रवास
मुळचा रत्नागिरी येथील असणाऱ्या मालावी आंब्याचा दक्षिण अफ्रिका खंडतला प्रवास रंजक आहे. दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील एका उद्योजकाने ‘मालावी मॅंगोज’ या कंपनीची स्थापना केली होती. यानंतर त्यांनी रत्नागिरी येथील दापोली कृषी विद्यापीठातून हापूस आंब्याचे कलम मालावी येथे नेऊन त्याचे रोपण केले. तब्बल 700 हेक्टरावर कलमाची दाट पध्दतीने लागवड करण्यात आली होती. 2017 पासून त्यांनी या मालावी हापूस आंब्याचे उत्पादन सुरु केले होते. यानंतर या रसाळ आंब्याची निर्यात सुरु झाली. गेल्या चार वर्षापासून हा आंबा पुणेकरांसाठी दाखल होत आहे.