करमाळा : गेल्या काही दिवसांपासून (Solapur) सोलापूर जिल्ह्यात वातावरण बदल झाला आहे. चार दिवसांपूर्वी बार्शी तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते तर शुक्रवारी करमाळा तालुक्यातील केम परिसरात वादळी वाऱ्यासह (Heavy Rain) पावसाने हजेरी लावली. यामध्ये केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. (Climate Change) वातावरणातील बदलामुळे केळीच्या दरात घट झाली होती. शिवाय आता तोडणी काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला आहे. एकट्या केम परिसरात तब्बल 25 हेक्टरावरील केळी आडवी झाली आहे. यामध्ये 70 लाखाचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.
करमाळा तालुक्यातील उजनी धरणाकडच्या परिसरात केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. उजनीचे पाणी असल्याने येथील शेतकऱ्यांनी ऊसापेक्षा केळीवर अधिक भर दिला आहे. असे असताना गेल्या काही दिवसांपासून केळीच्या दरात घट झाली होती. त्यामुळे आता तोडणीला आलेल्या केळीला काय दर मिळणार या विवंचनेत येथील शेतकरी असताना शुक्रवारी अचानक झालेल्या पावसामुळे केळी बागा आडव्या झाल्या आहेत. केम परिसरातील 20 शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. केळीची वाढ आणि लागलेला माल व सोसाट्याचा वारा यामुळे अवघ्या काही वेळात केळी बागा आडव्या झाल्या आहेत.
खरीप हंगाम तोंडावर आला असून हा पाऊस खरीपपूर्व मशागतीसाठी पोषक मानला जात आहे. यामुळे मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. तर सरासरीएवढा पाऊस झाला की शेतकरी चाढ्यावर मूठ ठेवण्याच्या तयारीत आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे खरीप पेरणीसाठी अनुकूलता निर्माण झाली आहे. आता नांगरण, मोगडणी ही कामे पूर्ण करण्यास सुरवात होणार असून मशागतीची कामे पूर्ण होताच पेरणी कामांना सुरवात होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. केळी उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
केळी बागा अंतिम टप्प्यात असतानाच पावसामुळे झालेले नुकसान हे न भरुन निघण्यासारखे आहे. लाखोंचा खर्च करुन शेतकऱ्यांनी बागा जोपासल्या होत्या. मात्र, काही वेळच्या वादळी वाऱ्यात सर्वकाही भुईसपाट झाले आहे. केम येथील 20 केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी वाऱ्याचा फटका बसला असून केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले असून केम येथील शेतकरी महेश तळेकर यांनी आपत्कालीन म्हणून तातडीने शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली आहे.