ऐन रब्बीत ‘डीएपी’ खताचा तुटवडा ; पुरवठ्यातही राजकारण, शेतकऱ्यांकडे काय आहे पर्याय?
मध्यंतरीच्या पावसानंतर आता रज्यात कोरडे वातावरण असल्याने रब्बी पेरणीची लगबग सुरु आहे. शिवाय या उघडीपीच्या काळातच शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ धरण्याचा सल्ला कृषितंत्रज्ञांनी दिलेला आहे. मात्र, पेरणी करताना 'बेसल डोस' म्हणून ओळखला जाणाऱ्या डीएपी अर्थात 18:46 खताचा तुटवडा निर्माण झाला आहे.
लातूर : मध्यंतरीच्या पावसानंतर आता रज्यात कोरडे वातावरण असल्याने (Rabbi Season) रब्बी पेरणीची लगबग सुरु आहे. शिवाय या उघडीपीच्या काळातच (Farmer) शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ धरण्याचा सल्ला कृषितंत्रज्ञांनी दिलेला आहे. मात्र, पेरणी करताना ‘बेसल डोस’ म्हणून ओळखला जाणाऱ्या (DAP fertilizer) डीएपी अर्थात 18:46 खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पेरणीवर त्याचा परिणाम होणार. एकतर पावसामुळे पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. आता कुठे पेरणी कामाला वेग येत असतानाच हा नवा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
रब्बी हंगामाच्या अनुशंगाने केंद्र सरकारने खताची पुर्वतयारी केली होती. मात्र, असे असताना आता पुरवठा कसा झाला नाही असा प्रश्न सर्वानाच पडलेला आहे. मात्र, खत वाटपातही राजकारण झाले आहे. आगामी काळात उत्तरप्रदेश येथील विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना खुष करण्यासाठी मुबलक प्रमाणात खताचा पुरवठा करण्यात आला आहे तर उर्वरीत देशात कमी पुरवठा करण्यात आल्याने ऐन रब्बी पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
उत्पादनावरही होणार परिणाम
रब्बी हंगामात मुख्य पिकांबरोबर नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याची लागवड सुरु आहे. शिवाय लागवडीच्या दरम्यान, डीएपी चा डोस म्हणजे उत्पादनात वाढ असेच समजले जाते. डीएपी वगळता इतर खतांना शेतकरी महत्व देत नाहीत. शिवाय यंदा पोषक वातावरण आणि मुबलक पाणीसाठा असल्याने कांद्याचे क्षेत्र वाढत आहे. मात्र, लागवडीच्या दरम्यानच, खताचा तुटवडा भासू लागल्याने उत्पादनात घट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
मंजूर आहे पण पुरवठा नाही
राज्यात रब्बी हंगामासाठी 48 हजार टन डीएपी खताची मागणी करण्यात आली होती. केंद्र सरकारने 93 हजार 240 टन डीएपी खत देण्यासाठी मंजूरीही दिली होती. त्यानुसार नियमित पुरवठाही होत होता. मात्र, आता रब्बी हंगामाच्या तोंडावर पुरवठा विस्कळीत झाला आहे. राज्यात 51 लाख रब्बाचे सरासरी क्षेत्र आहे. सध्या रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारीच्या पेरण्या सुरु आहेत. अशातच नियोजनाप्रमाणे पुरवठा होत असलेल्या डीएपी खताचा तुटवडा भासू लागला आहे. मंजूर साठ्यापेक्षा कमी पुरवठा केला जात आहे. डीएपीची 50 किलोची बॅग ही सध्या 1200 रुपयांना मिळत आहे.
18:46 (डीएपी) वर काय पर्याय आहे
शेतकऱ्यांची मानसिकताच झाली आहे की 18:46 या खतानेच पिकाला चांगला उतार येतो. याच मानसिकतेचा फायदा खत विक्रेते घेत आहेत. या खताची कृत्रिम टंचाई निर्माण करुन अधिकच्या दराने त्याची विक्री करतात. मात्र, 18:46 हे खत जरी सहज उपलब्ध नाही झाले तरी 10:26:26, 12:32:16, 15:15, 20:20:00 या खतांचा पर्यांय शेतकऱ्यांकडे आहे. शिवाय मिश्र खतांचा वारर करुनही भरघोस उत्पादन घेता येते. मात्र शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलण्यााची आवश्यकता आहे. अखेर कृषी विद्यापीठाने शिफारस केलेसे रेशिओ खते आहेत त्यामध्ये नायट्रोजन, फॅास्परस यांचे मिश्रण करुनही वापर करता येत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
बासमती तांदूळ अजून ‘भाव’ खाणार, पावसामुळे नुकसानीचा परिणाम दरावर
शेतकऱ्यांच्या मनातला दर बाजारात, दोन महिन्यात 4 हजाराने वाढले कापसाचे भाव
कांदा मार्केट सुरु पण दराचा ‘वांदा’ झाल्याने शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेत