Farmers News : रब्बी हंगामात गहू हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड, वेळेवर वीज मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात
गहू हरभरा पिकाची लागवड, वातावरण देखील चांगले, वीज पुरवठा अनियमित आणि वारंवार खंडित होत असल्यामुळे शेतकरी टेन्शनमध्ये
धुळे : यंदा पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी (Farmer) मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात (Rabi season) गहू हरभऱ्याची लागवड केली. मात्र वेळेवर वीज मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला असल्याचं चित्र धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे शेतातील विहिरींना पाणी देखील उपलब्ध आहे. मात्र वीज वितरण कंपनी (Electricity Distribution Company) रात्री आठ तास वीजपुरवठा सुरु करते. त्यातही अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात पाणी द्यायला जावे लागते.
विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी सर्प दंश झाल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे वीज वितरण कंपनीने दिवसा सलग आठ तास वीज द्यावी अशी मागणी धुळ्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
वीज पुरवठा अनियमित आणि वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. रात्री वीज दिल्याने शेतकऱ्याला दोन वाजेपर्यंत पाणी द्यावे लागते. अनेक वेळा हे वीज खंडित होते त्यामुळे पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांना दिवसाला वीज द्यावी अशी मागणी आता शेतकरी करू लागला आहे.
नांदेडमध्ये सध्या हरभरा पिकाच्या काढणीला सुरुवात झाली आहे. मध्यंतरी पंधरा दिवस राहिलेल्या थंडीच्या तीव्र लाटेमुळे हरभरा उत्पादनात घट झाली आहे. एकरी दहा ते बारा क्विंटल हरभऱ्याचा उतारा अपेक्षित असताना प्रत्यक्षात सात ते आठ क्विंटल इतकाच उतारा काढणीनंतर मिळतोय. त्यामुळे हरभरा पिकाच्या उत्पादनावर केलेला खर्च निघून जाईल, पण फारसा नफा शेतकऱ्यांच्या हातात पडणार नाही. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.