रब्बी हंगामातील पिकांच्या पाण्याचे असे करा व्यवस्थापन, वेळेत बहरतील पिके अन् उत्पादनातही वाढ
सध्या रब्बी हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या असून पहिल्या मशागतीची कामेही सुरु झालीआहेत. पेरणीपासूनच योग्य नियोजन केले तर पुढे उत्पादनात वाढ होणार आहे. खताचे नियोजन हे पिकाच्या अवस्थेनुसार ठरते. पण पाण्याचे योग्य नियोजन हे रब्बी हंगामातील सर्वात महत्वाचा भाग आहे.
लातूर : सध्या (Rabi season) रब्बी हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या असून पहिल्या मशागतीची कामेही सुरु झालीआहेत. पेरणीपासूनच योग्य नियोजन केले तर पुढे (production) उत्पादनात वाढ होणार आहे. खताचे नियोजन हे पिकाच्या अवस्थेनुसार ठरते. पण (water management) पाण्याचे योग्य नियोजन हे रब्बी हंगामातील सर्वात महत्वाचा भाग आहे. प्रत्येक पिकाला त्याच्या अवस्थेनुसार पाणी देणे गरजेचे असते. मात्र, पाणी मुबलक प्रमाणात आहे म्हणून देणे हे देखील चुकीचे आहे. आजही शेतकरी पाण्याच्या नियोजनबद्दल तत्पर नाही. त्यामुळे योग्य वेळी पाण्याचे नियोजन कसे करावे याची माहिती घेणार आहोत.
पाणी व्यवस्थापन
पाण्याचे व्यवस्थापन हे शेतजमिनीच्या दर्जानुसार ठरत असते. चांगल्या प्रतिच्या जमिनीकरिता 18 दिवसांच्या अंतराने, मध्यम जमिनीसाठी 15 दिवसांच्या अंतराने सात हलक्या जमिनीस 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या 8 ते 10 पाळ्या ह्या रब्बी हंगामात घ्याव्याच लागतात. एकच पाणी देणे शक्य असल्यास पेरणीनंतर 21 ते 25 दिवसांनी द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर 21 ते 25 दिवसांनी व दुसरे 55 ते 60 दिवसांनी द्यावे .
रब्बी ज्वारी
ज्वारी हे या हंगामातील मुख्य पिक आहे. सर्वसाधारणपणे 70 ते 75 दिवसांत ज्वारी ही फुलोऱ्यात येते. ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी मिळाल्याने उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. एवढेच नाही तर कणसाचे वजन वाढते व ज्वारीचा दर्जा सुधारतो. पेरणीनंतर महिन्याभराने ज्वारीची वाढ जोमात असते. त्या दरम्यान पाणी दिले वाढ होण्यास अणखीन मदत होते. तर ज्वारी पोटरीत असताना दुसरे पाणी दिले तर दाणे भरण्यापर्यंत पुन्हा देण्याची देण्याची आवश्यकता भासणार नाही. ज्वारीच्या कणसात 90 ते 95 दिवसांनी दाणे भरण्यास सुरवात होते. त्यावेळी पाणी दिल्यास उत्पादनात वाढ तर होणार आहेच शिवाय काढणीच्या दरम्यान सोयीस्कर होणार आहे. शक्यतो तीन पाण्यातच ज्वारी पिक हे पदरात पडते पण जिरायत क्षेत्रावर गरज भासल्यास चौथे पाणी द्यावे
हरभरा
जिरायती क्षेत्रात ओलावा खूप कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर फुले येऊ लागताना द्यावे. मध्यम प्रकारच्या जमिनीत 20 ते 25 दिवसांनी पहिले, 45 ते 50 दिवसांनी दुसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरी पाणी द्यावे. जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीला भळी पडण्याच्या आत पाणी द्यावे. हरभऱ्यास प्रमाणशीर पाणी देणे अत्यंत महत्वाचे असते. पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा मूळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते. तर स्प्रिंक्लरने पाणी दिल्यास उत्पादन चांगली वाढ होते.
सूर्यफूल
यंदा मराठवाड्यात सुर्यफूलाच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. रोपावस्था, फुलकळी अवस्था, फुलोऱ्याची अवस्था, दाणे भरण्याची अवस्था या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याचा अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात, उत्पादनात घट येते.