Nashik : अर्ध्या एकरातील मेथीवर फिरवला रोटर, शेतीमालाचे तेच भाजीपाल्याचे
भर पावसाळ्यात भाजीपाल्याला चांगला दर मिळतो म्हणून देवळा तालुक्यात भाजीपाला क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी हा प्रयोग करतात. पण मेथी विक्रीला आली असतानाच बाजारपेठेतील दरात मोठी घसरण झाली. 10 रुपयाला अर्धा डझन पेंड्या देण्याची नामुष्की गिरासी यांच्यावर आली होती.
मालेगाव : उत्पन्न वाढीसाठी शेतकरी एक ना अनेक प्रयोग करीत आहे. केवळ (Main Crop) मुख्य पिकावर अवलंबून न राहता भाजीपाल्याचाही आधार घेतला जात आहे. मात्र, बाजारपेठेतील दर आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे उत्पादनाची शाश्वतीच राहिलेली नाही. आता देवळा तालुक्यातील वासोळ येथील शेतकऱ्याने आर्ध्या एकरामध्ये (Fenugreek cultivation) मेथी लागवडीचा प्रयोग केला होता. तीन महिने मेथी जोपासली पण आता विक्रीच्या दरम्यान दरात कमालीचा घट झाली आहे. त्यामुळे वाहतूक आणि विक्रीचा खर्च पवडत नसल्याने शेतकऱ्यांने या (Vegetable) भाजीपाल्यावर चक्क रोटर फिरवून क्षेत्र रिकामे केले आहे. तर दुसरीकडे सोयाबीनसह हरभरा आणि तुरीच्या दरातही घट होत आहे. निसर्गाची अवकृपा त्यात बाजारपेठेतील चित्र यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
दुहेरी नुकसान टाळण्यासाठी घेतला निर्णय
वासोळ येथील शेतकरी नारायण गिरासी यांनी अर्ध्या एकरामध्ये मेथीची लागवड करुन उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला होता. पारंपरिक पिकांमधून पदरी काहीच पडत नाही त्यामुळे त्यांनी हा प्रयोग केला. मात्र, मेथीचे घटते दर आणि वावरातच मेथीला फुले येऊ लागल्याने होणारे नुकसान टाळ्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. आता खरिपाच्या तोंडावर त्यांनी मेथी पीक तर मोडले पण खरिपातील पीक घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
काय आहे बाजारपेठेतले चित्र?
भर पावसाळ्यात भाजीपाल्याला चांगला दर मिळतो म्हणून देवळा तालुक्यात भाजीपाला क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी हा प्रयोग करतात. पण मेथी विक्रीला आली असतानाच बाजारपेठेतील दरात मोठी घसरण झाली. 10 रुपयाला अर्धा डझन पेंड्या देण्याची नामुष्की गिरासी यांच्यावर आली होती. त्यामुळे या मेथीवर अधिकचा खर्च करण्यापेक्षा वावराबाहेर काढणेच त्यांनी पसंत केले.
पीक पध्दतीमधील बदलानेही नुकसानच
उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला जातो.मात्र, असे करुनही उत्पादन पदरात पडेल असे नाही. नारायण गिरासी यांनी मेथी पिकावर जेवढा खर्च केला तेवढे उत्पादन तर सोडाच पण यामधून अधिकचे नुकसानच झाले आहे. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी मेथीवर रोटर फिरवला अन् आता खरिपासाठी क्षेत्र रिकामे केले आहे.