Inflation Effect: महागाईमुळे रुढी-परंपरेलाच पुन्हा महत्व, आता किराणा दुकानात नव्हे तेल घाण्यावर नागरिकांच्या रांगा
काळाच्या ओघात प्रक्रिया उद्योगामध्येही बदल झाले आहेत. पूर्वी शेतकरी तेलबिया घेऊन गिरण्यांवर जात होते. याठिकाणी प्रक्रिया करुन तेल दिले जात होते पण त्यानंतर खाद्यतेल थेट बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. शिवाय तेलघाण्याच्या गिरण्याही बंद पडल्या. जो-तो किराणा दुकानातूनच खाद्यतेलाची खरेदी करु लागले आहेत.
नांदेड : दिवसेंदिवस (Inflation) महागाईच्या झळा अशा बसत आहेत की सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जीवनशैलीत बदल करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. जीवनशैली तर बदलत आहेच पण नागरिकांना तडजोड करुन जीवन जगण्याची नामुष्की ओढावली आहे. (Fuel Rate) इंधनाचे दर वाढल्याने ट्रॅक्टरची जागा आता बैलजोडी घेत आहे तर दुसरीकडे शेतकरी आता (Edible oil) खाद्यतेल विकत घेत नाही तर तेलबिंया गिरण्यांवर नेऊन तेल काढून आणत आहे. या दोन्ही बाबी केवळ वाढत्या महागाईमुळे आहेत. त्यामुळे बदलत्या काळात आत्याधुनिकतेचे महत्व सांगणारे सरकारच आता मूलभुत सोई-सुविधांसाठी मागे पडत आहेत. यंदाच्या वर्षात वाढत्या उन्हाच्या झळांपेक्षा महागाईच्या झळा अधिक तीव्र आहेत.
1990 पर्यंत काय होती स्थिती?
काळाच्या ओघात प्रक्रिया उद्योगामध्येही बदल झाले आहेत. पूर्वी शेतकरी तेलबिया घेऊन गिरण्यांवर जात होते. याठिकाणी प्रक्रिया करुन तेल दिले जात होते पण त्यानंतर खाद्यतेल थेट बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. शिवाय तेलघाण्याच्या गिरण्याही बंद पडल्या. जो-तो किराणा दुकानातूनच खाद्यतेलाची खरेदी करु लागले आहेत. मात्र, आता 1 किलो खाद्यतेलासाठी 200 रुपयांपेक्षा अधिकची किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या तेलबियां गिरण्यांवर घेऊन जाऊ लागला आहे. यामध्ये केवळ प्रक्रियेसाठी लागणार खर्च घेतला जातो. त्यामुळे ज्यांच्याकडे तेलबिया आहेत ते शेतकरी आता थेट तेल घाण्यावर आढळून येत आहेत.
तेलघाण्याचे तेल शरिरासाठीही पौष्टीक
वाढत्या दरामुळे बाजारात 200 रुपये खर्ची करुन 1 किलो तेल घेण्यापेक्षा तेलबिया घेऊन घाण्यावर काढलेले तेल अधिक उत्तम. यामुळे उत्पादनावर खर्च तर नाहीच पण दर्जेदार असे तेल मिळते. जे मानवी शरिरासाठी पौष्टीक मानले जाते. ओढावलेली परस्थिती आणि शरिरासाठी होणारे फायदे लक्षात तेल घाण्यावरील तेलच पौष्टीक असे म्हणण्याची वेळ आली आहे.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तेलघाण्यांवर गर्दी होत आहे. शेतकरी आपल्याकडील तेलबिया घेऊन तेल घेतो. याकरिता शेतकऱ्याला केवळ करणावळ द्यावी लागते.
करडईतून अधिकचा फायदा
आता खाद्यतेलांच्या दराचा भडका उडाल्याने अनेकजण तेलबियांतून तेल निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेऊ लागले आहेत. करडई उत्पादकांनी तर करडईची विक्रीच केली नाहीत. त्यामुळे सर्वात महाग असलेले करडईचे तेल हे शेतकऱ्यांना स्वस्तामध्ये मिळते. अधिकच्या दरासाठी शेतकऱ्यांनी करडईचे उत्पादन घेतले मात्र, अंतिम टप्प्यात अशाप्रकारे फायदा होताना शेतकऱ्यांना होऊ लागला आहे.