या कारणामुळे हरभऱ्याच्या उत्पन्नात घट, चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा
सद्या हरभऱ्याला 4 ते साडेचार हजार रुपये क्विंटल असा भाव आहे. यापेक्षा अधिकचा भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
धुळे : धुळे जिल्ह्यात (dhule) रब्बी हंगामात (Rabi season) गहू पीकाबरोबर हरभऱ्याचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र यावेळी शेवटच्या टप्प्यात थंडी कमी झाल्याने हरभऱ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या (gram crop) उत्पन्नात घट झाली असून आता भाव चांगला मिळावा अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करीत आहे. धुळे जिल्ह्यात मोठ्या संख्येने रब्बी हंगामात हरभऱ्याची लागवड केली जाते. यावर्षी देखील गहूसोबतच हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लागवड केली होती.
4 ते साडेचार हजार रुपये क्विंटल असा भाव आहे
सुरुवातीच्या काळात पडलेल्या थंडीमुळे उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र काढणीच्या वेळी अचानक थंडी कमी झाली आणि त्याचा परिणाम थेट हरभऱ्याच्या पिकावर झाला आहे. दाणे बारीक पडल्यामुळे उत्पन्न देखील कमी झाले आहे. आता सध्या शेतकऱ्यांकडून या हरभऱ्याचे दाणे बनवण्याचे काम मशीनद्वारे केले जात आहे. सद्या हरभऱ्याला 4 ते साडेचार हजार रुपये क्विंटल असा भाव आहे. यापेक्षा अधिकचा भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मोठ्या प्रमाणात फुल शेतीची लागवड
दरवर्षी धुळे शहरात उन्हाळ्यात यात्रा उत्सव आणि सणांमुळे फुलांना मोठी मागणी असते. मात्र फुले उपलब्ध होत नसल्याने फुलाची टंचाई भासत असते. यावर्षी मात्र उत्सवासाठी शेतकऱ्यांनी धुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात फुल शेतीची लागवड केली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात शहरात फुलांचे टंचाई भासत असल्याने नाशिकसह पुणे नगर आणि इतर जिल्ह्यातून धुळे शहरात झेंडू, मोगरा, गलेंडर, चाफा आदी फुल मोठ्या प्रमाणावर मागवली जातात.
यात्रोत्सवासाठी फुलांची कमतरता जाणवणार नाही
यंदा धुळे तालुक्यात असलेल्या शेतकऱ्यांनी फुल शेती केल्याने मुबलक प्रमाणात फुले उपलब्ध होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या सण आणि यात्रोत्सवासाठी फुलांची कमतरता जाणवणार नाही. गेल्या वर्षी शहरात फुलांची टंचाई भासत असल्याने नाशिक कल्याण या भागातून शहरात फुल मागवली जात होती. मात्र यावेळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात फुल शेती शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे फुलांची टंचाई भासणार नाही आणि स्थानिक शेतकऱ्यांना चांगला दरही मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.