Rabi Season : काय सांगता ? रब्बीत काळ्या गव्हाचा पेरा, शेतकऱ्याच्या नव्या प्रयोगाचे कृषी विभागालाही कुतूहल
कितीही संकटे आले... नुकसान झाले तरी पुन्हा बळीराजा हा सावरत आहे. यंदाच्या सालात तर एक पीक पदरात पडलेलं नाही. खरिपात अतिवृष्टीने थैमान घातंल अन् फळबागा तोडणीला आल्या असताना अवकाळीची अवकृपा झाली हे कमी म्हणून की काय नुकसानभरपाईच्या दरम्यान पीक विमा कंपन्यांचा मनमानी कारभार. चोही बाजूने संकटात असताना देखील शेतकरी पुन्हा उभारी घेत आहे.
औरंगाबाद : कितीही संकटे आले… नुकसान झाले तरी पुन्हा बळीराजा हा सावरत आहे. यंदाच्या सालात तर एक पीक पदरात पडलेलं नाही. खरिपात अतिवृष्टीने थैमान घातंल अन् फळबागा तोडणीला आल्या असताना अवकाळीची अवकृपा झाली हे कमी म्हणून की काय नुकसानभरपाईच्या दरम्यान पीक विमा कंपन्यांचा मनमानी कारभार. चोही बाजूने संकटात असताना देखील शेतकरी पुन्हा उभारी घेत आहे. पारंपारिक शेती पध्दतीला फाटा देत आधुनिकतेची कास धरत आहे. मराठवाड्यात शेती पध्दतीमध्ये अमूलाग्र बदल होत असून यंदाच्या रब्बीत औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंग्री शिवारात तर काळ्या तांदळाचा प्रयोग केला जात आहे. याचा फायदा काय हे कृषी विभागालाही सांगता आलेला नाही पण शेतकऱ्याच्या नव्या प्रयोगाचे कुतूहल कृषी विभागाला देखील आहे.
यापूर्वी नांदेड, अकोला, पुणे जिल्ह्यात हा प्रयोग करण्यात आला होता. यंदा पोषक वातावरण असल्याने कृष्णा फलके यांनी काळ्या गव्हाचा पेरा केला आहे. पारंपरिक गव्हाप्रमाणेच याची पेरणी पध्दत आहे. त्यामुळे उत्पादनात काय फरक होतो हे पहावे लागणार आहे.
काळ्या गव्हाची थोडक्यात माहिती..
काळ्या गव्हाचे वाण हे पंजाब कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहे. यापूर्वी राज्यातील पुणे, अकोला आणि मराठवाड्यातीलच नांदेडमध्ये याचे उत्पादन घेण्यात आले होते. सर्वात प्रथम हे पंजाब, हरियाणा या राज्यात तर आता हळूहळू हे वाण इतर राज्यांमध्येही पेरले जात आहे. पेरणीकरिता एकरी 40 किलोपेक्षाही कमी बियाणाची आवश्यकता असते. तर 10 ते 12 क्विंटल याला एकरी उतार आहे. सेंद्रिय खताचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होते. बाजारपेठेत काळ्या गव्हाला 6 हजार 500 चा सरासरी दर मिळतो.
काळ्या गव्हाचे औषधी महत्व
काळ्या तांदळाप्रमाणे काळ्या गव्हाला औषधी महत्व आहे. हा गहू रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यावर गुणकारी असल्याचा दावा केला जात आहे. शिवाय याच्या उत्पादनासाठी सेंद्रिय खताचाच वापर करण्याची शिफारस विद्यापीठातूनच करण्यात आली आहे. काळ्या गव्हाच्या माध्यमातून मात्र, मराठवाड्यातील शेतकरी हे पारंपारिक पिकांना फाटा देत नवीन प्रयोग करीत आहेत. काळा गहू हा जरी वेगळा वाटत असला तरी याचे औषधी महत्व असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भविष्यात क्षेत्र वाढणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
रोगराईचा धोकाही कमीच
वातावरणातील बदलाचा परिणाम हा तसा प्रत्येक पिकावर पाहवयास मिळतो. मात्र, काळ्या गव्हाची रोगप्रतिकार शक्ती ही चांगली आहे. त्यामुळे यावर मावा, तुडतुडे याचा परिणाम होत नाही. शिवाय या पिकाचे मुळ ही मजबूत असल्याने ओंब्या ह्या खाली जमिनीवर पडत नाहीत तर अवकाळी पावसामुळेही याचे नुकसान होत नाही. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीपासून याचा बचाव होतो. पीक पध्दतीमध्ये बदल म्हणून प्रायोगिक तत्वावर याचे सध्या तरी उत्पादन घेतले जात आहे. आता किती उत्पादन होते यावरच भविष्यातील पेरा अवलंबून आहे.