Rain : सांगलीत पावसाचा धुमाकूळ सुरुच, विजांचा कडकडाट अन् जनजीवन विस्कळीत
सांगली जिल्ह्यात अचानक सुरु झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरासह ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची रिपरीप ही सुरुच होती. शिवाय जोगोजागी झाडांची पडझड आणि त्यामुळे शहरवासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर दुसरीकडे द्राक्ष छाटणीची कामे सुरु असतानाच पावसाने हजेरी लावल्याने कामांचा तर खोळंबा झाला आहेच पण ढगाळ वातावरणामुळे कीड-रोगराईचा धोका वाढला आहे.
सांगली : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली असली तरी सांगली जिल्ह्यात मात्र अवकृपा सुरुच आहे.शुक्रवारी रात्री विजेच्या कडकडाटासह (Heavy Rain) पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्याने वाहनांचेही नुकसान झाले आहे. पावसामध्ये सातत्य राहिल्याने (Kharif Crop) खरिपातील पिकांवर टांगती तलवार तर आहेच पण मशागतीची कामेही खोळंबलेली आहेत. यातच ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सांगलीकरांना प्रतिक्षा आहे ती पावसाच्या उघडीपीची. शुक्रवारी रात्री जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भासह मराठवाड्यात पावसाने खरिपातील पिके पाण्यात आहेत तर सांगली जिल्ह्यात खरिपातील पिकांसह (Vineyard) द्राक्ष बागांना मोठा फटका बसलेला आहे.
झाडे कोसळल्याने वाहनांचे नुकसान
शुक्रवारी रात्री अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली होती. दरम्यान, वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर लावलेल्या वाहनांचेही नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर जागोजागी झाडे पडल्याने वाहतूकीचीही समस्या निर्माण झाली होती. जिल्ह्यातील पलूस, वाळवा, शिराळा, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव आधी तालुक्यात पावसाने दमदार बॅटिंग केली आहे.
नारळाच्या झाडावर कोसळली वीज
वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी ते तांदुळवाडी रोडवर शेतकरी दिलीपराव गणपतराव देसावळे यांच्या विहिरी जवळील नारळाच्या झाडावर सायंकाळच्या सुमारास विज कोसळली. मात्र, रात्रीच्या वेळी शेतावर कोणी नसल्याने दुर्घटना टळली आहे. पावसामुळे पुन्हा खरीप पिकांवर परिणाम होणार असून पिकांची वाढ खुंटणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने मशागतीच्या कामांना वेग आला होता पण रात्री झालेल्या पावसामुळे कामे तर खोळंबली आहेतच पण पिकांमधील तणही आता जोर धरणार आहे.
द्राक्ष बागायतदार संकटात
सांगली जिल्ह्यात अचानक सुरु झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरासह ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची रिपरीप ही सुरुच होती. शिवाय जोगोजागी झाडांची पडझड आणि त्यामुळे शहरवासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर दुसरीकडे द्राक्ष छाटणीची कामे सुरु असतानाच पावसाने हजेरी लावल्याने कामांचा तर खोळंबा झाला आहेच पण ढगाळ वातावरणामुळे कीड-रोगराईचा धोका वाढला आहे. पुन्हा पावसाला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये भर पडली आहे.