सोलापूर : जिल्ह्यातील बार्शी शहराला लागून असलेल्या (Indreshwar Sugar Factory) इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयाची संतप्त (Farmer) शेतकऱ्यांनी तोडफोड केली आहे. भाजप नेते (Harshawardhan Patil) हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित असलेला हा साखर कारखाना असून गेल्या काही महिन्यांपासून उसाची एफआरपी रक्कम थकीत आहेत. अनेकवेळा मागणी करुनही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे दिले जात नव्हते. त्यामुळे परिसरातील शेतकरी हे सोमवारी सकाळी कारखान्याच्या आवारात दाखल झाले होते. असे असतानाही कारखाना प्रशासनाकडून दखल घेतली गेली नसल्याने शेतकऱ्यांनी थेट कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड केली. 5 महिन्यापासून शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एफआरपीची रक्कम हा कारखान्याकडे थकीत आहे.
बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे परिसरात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित असलेला इंद्रेश्वर साखर कारखाना आहे. गाळपाच्या दरम्यान शेतकऱ्यांना वेगवेगळे आश्वासन देऊन गाळप केले जाते पण प्रत्यक्षात बीले अदा करताना त्याकडे दुर्लक्ष होते. गेल्या काही वर्षापासून हाच प्रकार सुरु आहे. यंदाही ऊसाचे गाळप होऊन पाच महिन्याचा कालावधी उलटला असताना देखील शेतकऱ्यांना हक्काचे पैसे हे मिळालेले नाहीत. त्यामुळे कारखान्याच्या गेटवर आंदोलन सुरु होते. असे असतानाही कारखाना प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने शेतकरी थेट कारखान्यात घुसले आणि कार्यालयाचे तोडफोड करण्यास सुरवात केली.
इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयात घुसून शेतकऱ्याने काचेच्या दरवाजाची तोडफोड केली. सोमवारी सकाळी शेतकऱ्यांनी थकीत एफआरपी रकमेची मागणी करीत कार्यालयाच्या गेटवर ठिय्या दिला होता. मात्र, कारखाना प्रशासनाने याची दखलच घेतली नाही. यापूर्वीही एफआरपीच्या मागणीवरुन शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. पण सातत्याने मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट गेट उघडून आतमध्ये प्रवेश केला. एवढेच नाही एफआरपी ची मागणी करीत कार्यलायाची तोडफोडही केली.
बार्शीसह लगतच्या माढा, परांडा, भूम, उस्मानाबाद या तालुक्यातील शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम ही गेल्या 5 महिन्यापासून साखर कारखान्याकडे थकीत होती. असे असतानाही शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी हे कारखान्याच्या गेटवर ठिय्या आंदोलन करीत होते. दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी कायद्याची पर्वा न करता कार्यालयाची तोडफोड केली. त्यामुळे आता तरी शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे साखर कारखाना देणार का हे पहावे लागणार आहे.