विदर्भात लम्पीची दहशत, नागपूर, वर्ध्यातील परिस्थिती काय?
आर्वी आणि आष्टी तालुक्यातील संबंधित गावांमधील जनावरांना इतर कोणत्याही निरोगी भागात प्रवेशास प्रतिबंधित करण्यात आले आहे. बाधित आढळून आलेल्या जनावरांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
विदर्भात लम्पी आजारानं चांगलाच धुमाकूळ घातला. या लम्पीमुळं नागपुरात तीन जनावरं ठार झाले. या आराजानं 16 गावं बाधित झालीत. 97 जनावरं बाधित झाली आहेत. आतापर्यंत 25 हजार 799 लसीकरणं झाल्याचं पशुसंवर्धन विभागानं सांगितलं. लम्पीमुळं हिंगणा, सावनेर, पारशिवनी, कामठी, नागपूर, मौदा, काटोल, कळमेश्वर ही तालुके बाधित झाली आहेत. जिल्ह्याला 1 लाख 10 हजार लसी प्राप्त झाल्यात. दोन लाख 50 हजार लसींची जिल्ह्या प्रशासनानं मागणी केलीय. जिल्ह्यातील सर्व गोरक्षण संस्थामध्ये सर्व पशुधनाला लसीकरणाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. युवराज केने यांनी सांगितलं.
नागपूर जिल्ह्यातील आजाराची तीव्रता अधिक असल्याने त्या सीमेवरील पाच किलोमीटर परिसरातील भंडारा जिल्ह्यातील 12 गावातील पशूंचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पशुधनाच्या संपूर्ण लसीकरणासाठी एक लाख अतिरिक्त लसी खरेदीचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पशुवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या आजारावर इलाज असून 100 टक्के यातून जनावरे बरी होतात. त्यामुळे नागरिकानी अफवेला बळी पडू नये. मात्र लक्षणे दिसताच लसीकरण करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. जिल्हात पशुधनाची संख्या 2 लाख 13 हजार 36 आहे. सध्या एक लाख 20 हजार 300 लस साठा जिल्हात उपलब्ध आहे. त्यातून लसीकरण सुरु आहे.
वर्धा जिल्ह्यात सात गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगसदृष्य आजाराची लक्षण आढळून आलीत. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी या आजाराची लक्षणे असलेली जनावरं आढळलेली गाव बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केलेत.
आर्वी शहर आणि आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा), सावळापूर, आष्टी तालुक्यातील वडाळा या गावांमध्ये लम्पीसदृष्य लक्षणे असलेली जनावरे आढळून आलीत. त्यामुळे ही गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
लगतच्या पाच किलोमीटर परिसरात असलेली गाव सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या गावांमधील बाधित जनावरे वगळता इतर गोवर्गीय जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.
आर्वी आणि आष्टी तालुक्यातील संबंधित गावांमधील जनावरांना इतर कोणत्याही निरोगी भागात प्रवेशास प्रतिबंधित करण्यात आले आहे. बाधित आढळून आलेल्या जनावरांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
या जनावरांना चारा व पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबत संबंधित नगर पंचायत व ग्रामपंचायतींना निर्देश देण्यात आले आहेत. लसीकरणासह आवश्यक उपाययोजना सुरू केल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी सांगितलं.