बीडवर दुष्काळाचं सावट, सोयाबीन करपू लागलं; पीक विमा कधी मिळणार? कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांची मागणी
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील शेतकरी सध्या भीषण दुष्काळसदृश्य परिस्थितीला सामोरे जात आहेत. सोयाबीनच्या शेतात उभा असलेला बंडू मारुती दिंडे हा शेतकरी पावसाअभावी वाळून गेलेलं पीक दाखवत आहे.
बीड: मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील शेतकरी सध्या भीषण दुष्काळसदृश्य परिस्थितीला सामोरे जात आहेत. सोयाबीनच्या शेतात उभा असलेला बंडू मारुती दिंडे हा शेतकरी पावसाअभावी वाळून गेलेलं पीक दाखवत आहे. ते सरकारला कर्ज माफ करण्याची विनंती करत आहेत. पीक नसताना शेतकरी कर्जाची परतफेड कशी करणार? अलीकडेच, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराचे तांडव आपण पाहिले. यामुळे हजारो हेक्टर पिके नष्ट झाली आहेत. दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाच्या कचाट्यात आहेत. मात्र, आजपर्यंत त्यांना सरकारकडून कोणतीही मदतीचे आश्वासन देण्यात आलेलं नाही.
जालना, औरंगाबदमध्येही पावसाच्या प्रतीक्षेत
केवळ बीडच नाही तर जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातही खूप कमी पाऊस झाला आहे. यामुळे पिके सुकत चालली आहेत. पावसाअभावी शेतकरी कर्जाच्या दलदलीत अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते हताश आणि निराश आहेत. या तीन जिल्ह्यातील शेतकरी तालुक्यांमध्ये पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान बीड जिल्ह्यात सामान्यपेक्षा 19% कमी पाऊस झाला आहे.
बंडू मारुती दिंडे म्हणतात, “गेल्या एक महिन्यापासून पाऊस पडलेला नाही. सोयाबीनच्या लागवडीसाठी रान तयार करण्यापासून बियाणे खरेदीपर्यंत बराच खर्च करावा लागतो. आतापर्यंत आम्ही आमच्या शेतात 70 हजार रुपये खर्च केले आहेत. पीक पाहता,सर्व खर्च वाया जाईल, असं दिसते. गेल्या महिन्यात पहिला पाऊस आला, तेव्हाच आम्ही सोयाबीनची पेरणी केली होती, पण तेव्हापासून आतापर्यंत एक महिना झाला आहे, पावसाचे चिन्ह नाही. पावसाअभावी जनावरांनाही चारा मिळत नाही. त्यांच्या चारासाठीही त्यांना भटकावे लागते. शेतकऱ्यांच्या या समस्येकडे कोण लक्ष देणार? आतापर्यंत सरकारचा एकही प्रतिनिधी आमच्या ठिकाणी आमच्या समस्या बघायला आला नाही, अशी खंत बंडू दिंडे व्यक्त करतात.
शेतकऱ्यांची मदतीसाठी साद
शेतकरी दिंडे राज्य सरकारने आमचे कर्ज माफ करावे, अशी भावना व्यक्त करतात. पीक विम्याचे पैसेही दिले गेले पाहिजेत, अशी मागणी ते करतात. गेल्या वर्षी आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत. या वर्षी देखील आम्हाला विम्याचे पैसे मिळतात की नाही हे माहित नाही, असं दिंडे म्हणतात. सरकारनं आमचे संपूर्ण कर्ज माफ करावं अशी आमची सरकारकडे मागणी आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा धोका निर्माण होईल. त्यामुळे सर्वप्रथम शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढले पाहिजे, असं ते म्हणतात.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात दरवर्षी पाण्याच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. पावसाअभावी शेतकरी शेती करू शकत नाहीत. येथील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाला सामोरे जात आहेत.
दुष्काळ सदृश्य स्थितीमागील कारण
विदर्भ आणि मराठवाडा प्रदेश कमकुवत मान्सूनमुळे सर्वाधिक प्रभावित आहेत. या भागातील शेतकऱ्यांची शेती पावसावर अवलंबून आहे. मराठवाड्याच्या भौगोलिक स्थितीनुसार या भागात चांगला पाऊस पडत नाही. अरबी समुद्रातून वाढणारा मान्सून मध्य महाराष्ट्रापर्यंत चांगला पाऊस देतो, तर तो मराठवाड्यात पोहचेपर्यंत कमकुवत होतो. ज्यामुळे बीड, लातूर, नांदेड आणि औरंगाबाद हे जिल्हे कोरडे राहतात. पावसाअभावी आणि सिंचनाची कमी साधने या भागांमध्ये शेतकरी अडचणीत आहेत.
इतर बातम्या:
Akola DCC Bank Recruitment 2021: अकोला जिल्हा बँकेत क्लार्क पदांवर भरती, पदवीधरांना सुवर्णसंधी