today forecast : कोकणात मुसळधार पावसाचा जोर वाढला, महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता
महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टीवर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र : हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात (Kokan rain update) आज सकाळपासून पावसाने चांगली सुरूवात केली आहे. गेले काही दिवस कोकणात पावसाने दडी मारली होती. मात्र काल व आज दिवसभर पावसाने चांगलीच सुरूवात केली आहे. गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसामुळे भात शेतीवर परिणाम झाला होता. मात्र काल पासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. श्रावण महिन्यातला (shrawan) पाऊस भात पिकांसाठी पोषक मानला जातो. त्यामुळे या पावसामुळे भातशेतीला चांगलाच बहर येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात (maharashtra rain update) आज अनेक ठिकाणी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
खरीप पिकांना जीवदान
परभणी जिल्ह्यात पावसाने जोरदार कमबॅक केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 18 मिलिमीटर पाऊस झाला आहे, त्यामुळे मान टाकलेल्या पिकांना जीवदान मिळालं आहे. पावसाच्या प्रतिक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने फार मोठा दिलासा मिळाला आहे. सोयाबीन कापूस ऊस पिकासाठी हा पाऊस संजीवनी देणारा ठरत आहे.
तानसा धरणाचे ७ दरवाजे उघडले
शहापूर तालुक्यातील मुबंईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा धरणाच्या पानलोट क्षेत्रात झालेल्या धुवांधार पावसामुळे तानसा धरणाचे ७ दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे या सात दरवाज्यामधून तानसा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
चिपळूण पावसाचा जोर वाढला
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर कोकणात पावसाने हजेरी लावल्यामुळे गारवा निर्माण झाला आहे. कालपासून सुरू असणाऱ्या पावसाची संततधार कायम आहे. चिपळूण बाजारपेठं मधील सखल भागामध्ये साठलेलं पाणी अद्याप कायम आहे. मात्र चिपळूणला पूरस्थितीचा धोका नाही असं प्रशासनाने जाहीर केलं आहे. पुढील दोन दिवसांसाठी कोकण किनारपट्टीवर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.मागील आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार एंट्री केली आहे. शुक्रवारी पहाटेपासून सुरू असलेला मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे.
धुळ्यात पहाटे तीन वाजल्यापासून पावसाने दमदार सुरुवात केली आहे. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली होती, दोन दिवसापासून धुळे जिल्ह्यात सर्वतर रिमझिम पाऊस होत होता. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली होती त्यामुळे पिकांची वाढ खुंटली होती तर पाण्याचा प्रश्न बिघड झाला होता. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसानंतर आज पहाटेपासून पावसाने सुरुवात केली आहे.