सोयाबीनबाबत शेतकऱ्यांनाच शेतकऱ्यांचा सल्ला, दर वाढीमागचे गणितही कळाले
नाही म्हणलं तरी सोयाबीनने आता 6 हजार 500 रुपयांचा टप्पा पार केलेला आहे. त्यामुळे आता तरी सोयाबीनची आवक वाढेल असा अंदाज व्यापारी बांधत असतील तो चुकीचा ठरणार आहे. कारण आवक कमी तर सोयाबीन रास्त भाव हे पक्के गणितच शेतकऱ्यांनी ठरवून घेतले आहे.
लातूर : नाही म्हणलं तरी (Soybean Rate) सोयाबीनने आता 6 हजार 500 रुपयांचा टप्पा पार केलेला आहे. त्यामुळे आता तरी सोयाबीनची आवक वाढेल असा अंदाज व्यापारी बांधत असतील तो चुकीचा ठरणार आहे. कारण आवक कमी तर सोयाबीन रास्त भाव हे पक्के गणितच शेतकऱ्यांनी ठरवून घेतले आहे. एवढेच नाही तर सोशल मिडीयावर शेतकरी प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या दराची माहिती घेऊन सोयाबीन विक्रीबाबत सल्ला देत आहेत. यापूर्वी व्यापारीच दराबाबत सल्ला देत होते पण आता ही भूमिकाही शेतकरीच पार पाडत आहेत.
दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. ती अद्यापही सुरुच आहे. मात्र, या दरम्यान महत्वाची गोष्ट ठरली आहे ती म्हणजे बाजारात मर्यादेत होणारी आवक. मागणीनुसारच सोयाबीनचा पुरवठा होत आहे. त्यामुळेच दर एकतर स्थिर राहत आहेत किंवा वाढत आहेत.
सोशल मिडीयावरही सोयाबीन दराचीच चर्चा
मध्यंतरी सोयाबीनचे दर वाढावे म्हणून शेतकरी मुलांनी सोशल मिडीयावर एक ट्रेंड सुरु केला होता. अगदी त्याप्रमाणेच सध्या सोशल मिडियावर सोयाबीनच्या दराला घेऊन मार्गदर्शन केले जात आहे. सध्याचे दर केवळ बाजारात आवक कमी होत असल्याने मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीचा गडबड न करता वाढीव दराची प्रतिक्षा करणे गरजेचे असल्याचा संदेश दिला जात आहे. एवढेच नाही तर प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीचे दर हे सांगितले जात आहेत. त्यामुळे कोणत्या बाजारसमितीमध्ये काय दर चालू आहे याची माहितीही शेतकऱ्यांना होत आहे.
लातूर बाजार समितीमध्ये 15 हजार पोत्यांची आवक
बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सोयाबीनचे दर हे स्थिर राहिले आहेत. मात्र, असे असतानाही सोयाबीनच्या आवकमध्ये जास्तीचा फरक पडलेला नाही. मंगळवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 13 हजार पोत्यांची आवक झाली होती तर बुधावारी 15 हजार पोत्यांची. त्यामुळे दरात चढउतार झाला तरी मात्र, आवकचा आकडा हा शेतकऱ्य़ांनी निश्चित केला आहे. बाजार समितीशिवाय प्रक्रिया उद्योगाकडूनही सोयाबीनची मागणी होत आहे. पण मागणीच्या तुलनेच पुरवठा होत नसल्याने सोयाबीनचे दर हे टिकून आहेत.
6 हजार 450 वर सोयाबीनचे दर स्थिर
गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात कायम वाढ होत होती. मात्र, मंगळवारपासून सोयाबीनचे दर हे स्थिर राहिलेले आहेत. असे असले तरी सोयाबीनची आवक ही मर्यादितच आहे. बुधवारी सोयाबीनला 6 हजार 450 चा दर मिळाला तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 13 हजार पोत्यांची आवक राहिली होती. मात्र, सोशल मिडियावरील सल्ला आत्मसात करुन सोयाबीन खरेदी-विक्रीचा आधार शेतकरी घेत आहेत.